कराड इंजिनिअरिंग कॉलेजची 14 कोटींची कामे मार्गी
प्रतिनिधी/ कराड
राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सोमवारी येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयास भेट देऊन या महाविद्यालयासह शासकीय तंत्रनिकेतन व औषध निर्माण शास्त्र महाविद्यालयाचा आढावा घेतला. आपल्या धडक निर्णयांची झलक दाखवताना उदय सामंत यांनी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे मुलीचे वसतिगृह व इनोव्हेशन सेंटर अशी 14 कोटींची कामे मार्गी लावली. तर आऊटसोर्सिंगमधून महाविद्यालयात काम करणाऱया 43 स्वच्छता कर्मचाऱयांना 4 हजार रूपयांची पगारवाढ लागू केली.
या निर्णयांची माहिती पत्रकार परिषदेत देताना मंत्री सामंत म्हणाले की, या महाविद्यालयात आऊटसोर्सिंगमधून 43 स्वच्छता कर्मचारी काम करत आहेत. महाविद्यालय परिसर स्वच्छ ठेवण्याचे काम ते करतात. त्यांना 12 हजार रूपये पगार देण्यात येत होता. मात्र महाविकास आघाडी सरकारच्या धोरणाप्रमाणे त्यांना किमान वेतन मिळाले पाहिजे, या हेतुने प्रत्येकी 4 हजार रूपये पगारवाढ केली आहे. येत्या एप्रिलपासून ही पगारवाढ लागू होणार असून जानेवारी 2022 पासून फरकासह दिली जाणार आहे.
अभियांत्रिकी महाविद्यालयाचे एससी, एसटी मुलींचे 216 क्षमतेचे वसतिगृह बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहेत. एकूण 9 कोटींचे हे वसतिगृह असून रत्नागिरी, औरंगाबादच्या धर्तीवर येथील महाविद्यालयात इनोव्हेशन सेंटर बांधण्यासाठी 5 कोटी रुपये दिले जाणार आहेत. याबरोबरच या महाविद्यालयात कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग हा अभ्यासक्रम सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. येथील रिक्त पदे भरण्याबाबतही निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या प्राचार्यांना कॅम्पस स्वच्छतेसाठी 50 हजार रूपये खर्चाचे अधिकार होते. ते आता तीन लाखांपर्यंत वाढवले आहेत. तर उपसंचालक, संचालक यांच्यापातळीवर 10 लाख रूपये खर्चाचे अधिकार देण्यात आले आहेत. त्यामुळे प्रत्येकवेळी मंत्रालयात येण्याची धावपळ वाचणार आहे. मात्र याचे ऑडीटही करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
आजपासून महाविद्यालये सुरू
1 फेब्रुवारीपासून राज्यात महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्याचे अधिकार प्रत्येक जिल्हय़ात जिल्हाधिकाऱयांना देण्यात आले आहेत. ते कोविड संसर्गाची स्थिती पाहून निर्णय घेणार आहेत. मात्र दोन डोस घेतलेल्या विद्यार्थ्यांनाच प्रवेश दिला जाणार आहे. यासाठी येथेही महाविद्यालयांमध्ये कॅम्प लाऊन लसीकरण करण्याबाबत जिल्हाधिकाऱयांशी बोलणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कराड इंजिनिअरिंग, फार्मसी, पॉलिटेक्निक ही महाविद्यालये चांगल्या पद्धतीने काम करत आहेत, असा दाखलाही त्यांनी दिला. अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. ए. टी. पिसे यांनी स्वागत केले. यावेळी सामंत यांच्या हस्ते महाविद्यालयाच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले.