मुंबई \ ऑनलाईन टीम
पोलीस विभागातील वाझे तर सापडला, पण अन्य विभागातील वाझेचा पत्ता आम्हाला लागला आहे. यामुळेच पावसाळी अधिवेशन दोन दिवसाचं करण्याचा निर्णय या सरकारने घेतला असा आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस यांनी केला. ‘मंत्री झाले आपल्या विभागाचे राजे आणि प्रत्येक विभागात एक-एक वाझे’ अशा शब्दात फडणवीस ठाकरे सरकारवर निशाणा साधला. महाराष्ट्रात जे सुरु आहे त्याला सरकार म्हणता येईल का? असा सवालही त्यांनी केला. भाजपच्या कार्यकारिणी आज बैठक पार पडली. यावेळी बोलताना फडणवीस यांनी कोरोना, शेतकरी, मराठा, ओबीसी आरक्षण, भ्रष्टाचार अशा अनेक मुद्द्यांवरुन महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला.
देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच महाराष्ट्रात जे सुरू आहे त्याला सरकार म्हणता येईल का? असा सवाल उपस्थित करत हे सरकार नसून ही सर्कस सुरू आहे, असा हल्लाबोल केला. कोरोना, मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण आणि भ्रष्टाचाराच्या मुद्द्यांवरुन फडणवीसांनी ठाकरे सरकारला लक्ष्य केलं. राज्याच्या इतिहासात भ्रष्टाचार, अनाचार, दुराचार, अत्याचारानं बरबटलेलं हे सरकार आहे.राज्यात फक्त अनागोंदी कारभार सुरू असून एक दिवस निर्णय घेतला जातो, मग दुसऱ्या तासाला स्थगिती दिली जाते. गम दुसऱ्या दिवशी निर्णय बदलला जातो. इथं राज्यात कोरोना काळात किड्यामुंग्यासारखी माणसं मरत असताना चांगलं काम केल्याचं सांगत स्वत:च पाठ थोपटवून घेतली जात आहे, असा घणाघात फडणवीसांनी यावेळी केला.
मुंबईच्या बाहेर महाराष्ट्र आहे का? नागपूर, औरंगाबाद, नाशिक, पुणे महाराष्ट्रात आहे का? मग कुठे आहे सरकार? नाशिक, नागपूर, औरंगाबादमध्ये एक कोविड सेंटर या सरकारनं काढलं का दाखवा? कोरोना काळात प्रत्येक खरेदीमध्ये भ्रष्टाचार पाहायला मिळाल्याचा गंभीर आरोपही फडणवीसांनी केलाय. राज्यात फक्त वसुली सरकार, १०० कोटी रूपयांच्या वसुली, पोलिसातला वाझे सापडला, अजून वेगवेगळ्या विभागातले वाझे आहेत, त्यांचे पत्ते आम्हाला सापडले आहेत, आमच्याकडे त्यांचे पत्ते आलेत, त्यामुळे अधिवेशन गुंडाळलं. अधिवेशनापासून हे सरकार पळ काढतंय कारण असं केलं तर आपला भ्रष्टाचार बाहेर येईल, असा दावा देवेंद्र फडणवीसांनी केला.
कोरोना परिस्थिती हाताळण्यात महाराष्ट्राचं नाव देशात बदनाम झालं. देशातील एकूण मृत्यूंपैकी सर्वाधिक ३३ टक्के मृत्यू महाराष्ट्रात झाले. ऑक्सिजन नाही म्हणून माणसं रस्त्यावर मेली, हे कुठलं कोरोना मुक्तीचं मॉडेल? कुणी आणलं हे मॉडेल? देशात कोरोनामुळे मेलेला प्रत्येक तिसरा व्यक्ती महाराष्ट्रातील आहे. ही मान शरमेनं खाली घालण्यासारखी गोष्ट आहे. उत्तर प्रदेशातील गंगा नदीत मृतदेह वाहून आल्याचं वारंवार दाखवण्यात येतं, पण बीडमध्ये एकाच रुग्णवाहिकेत २२ मृतदेह कोंबून नेले. त्याची फार चर्चा होत नाही. हे कुठलं मॉडेल आहे?, असा सवाल फडणवीसांनी यावेळी उपस्थित केला.