प्रतिनिधी/ धारबांदोडा
सावर्डे मतदार संघाचे आमदार तथा सार्वजनिक बांधकाममंत्री दीपक पाऊसकर यांनी रविवारी आपला वाढदिवस बिठ्ठोण तिसवाडी येथील लिट्ल एंजेल्स आश्रमातील विशेष मुलांसोबत साजरा केला. यावेळी हळदोणाचे आमदार ग्लेन टिकलो हे त्यांच्यासोबत उपस्थित होते.
वाढदिनी आपण मंदिरात जाऊन देवाचे दर्शन घेतो. पण विशेष मुलांचा सांभाळ करणाऱया लिट्ल एंजेल्स सारख्या संस्था खऱया अर्थाने सामाजिक मंदिरे आहेत व येथील मुलांचे संगोपन करणारे संस्थाचालक देवदूत आहेत, असे उद्गार मंत्री पाऊसकर यांनी यावेळी बोलताना काढले. या संस्थेमध्ये 17 मतीमंद मुलांचा सांभाळ केला जातो. मंत्री पाऊसकर यांनी या मुलांसोबत काही वेळ घालवून संस्थेच्या कार्याची माहिती जाणून घेतली. संस्थेतर्फे सुरु केलेल्या बेकरीचे यावेळी मंत्री पाऊसकर यांच्याहस्ते उद्घाटन करण्यात आले. संस्थेच्या कार्यासाठी आवश्यक असलेली मदत देण्याचे आश्वासनही त्यांनी संस्था चालकांना दिले.
आमदार ग्लेन टिकलो यांनी मंत्री पाऊसकर यांना वाढदिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी संस्थेच्या सदस्य सचिव डॉ. ऍनेसिया विएगश, पदाधिकारी पेद्रो डिलेमा, जेनेल्डा डिलेमा हे उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष व गोव्याचे माजी पोलीस महासंचालक डॉ. आदित्य आर्या यांनी नवी दिल्ली येथून मंत्री पाऊसकर यांना व्हिडिओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या. तसेच संस्थेच्या कार्याविषयी माहिती दिली.