प्रतिनिधी /वास्को
मच्छिमार व पशु सवर्धन खात्याचे मंत्री निळकंठ हळर्णकर यांनी शुक्रवारी वास्कोत भेट देऊन संबंधीत खात्याशी निगडीत समस्यांवर लोकांच्या तक्रारी ऐकल्या तसेच त्यांच्या विविध समस्यांवर चर्चा केली. पारंपरीक मच्छिमार लोकांच्या विविध समस्यांचे एक निवेदन आमदार संकल्प आमोणकर यांनी मंत्री निळकंठ हळर्णकर यांना दिले. वास्कोचे आमदार दाजी साळकर तसेच कुठ्ठाळीचे आमदार अँथनी वास, मुरगावचे नगराध्यक्ष लियो रॉड्रिक्स यांच्यासह मुरगाव तालुक्यातील विविध पंचायत क्षेत्रातील लोकप्रतिनिधी तसेच नागरीकांनीही मंत्री निळकंट हळर्णकर यांच्याशी संवाद साधला.
मंत्री निळकंठ हळर्णकर यांनी लोकांच्या तक्रारी व विविध समस्यांची जाणीव करून घेण्यासाठी शुक्रवारी सकाळपासून संध्याकाळी उशिरापर्यंत वास्को बायणातील रवींद्र भवनात उपस्थित होते. त्यांनी या भेटीत बायणा व काटे बायणा किनारी भागात पाहणी केली. सकाळी त्यांनी रवींद्र भवनात स्वयं सहाय्य गटाच्या महिलांना मार्गदर्शन केले. त्यानंतर विविध व्यवसायीक लोकांशी चर्चा केली. या बैठकीच्या वेळी माजीमंत्री व अखिल गोवा ट्रॉलर मालक संघटनेचे अध्यक्ष जुझे फिलिप डिसोजा उपस्थित होते. त्यांनी यावेळी मच्छिमारी जेटीसंबंधी विषय बैठकीत मांडला. संध्याकाळी मुरगावचे नगरसेवक, विविध ग्रामपंचायतींचे पंच तसेच काही नागरीकांसमवेत मंत्र्यांनी चर्चा केली. लोकप्रतिनिधींनी मच्छिमारीसंबंधी व पशु पालन व त्यांच्यावरील उपचारांसंबंधी समस्या मांडल्या. उपस्थित काही नागरिकांनीही या विषयावर आपल्या समस्या मांडल्या. संबंधीत खात्यांचे अधिकारीही यावेळी उपस्थित होते. मंत्री व अधिकाऱयांनी प्रश्नांची उत्तरे दिली तसेच विविध समस्यांवर मार्गदर्शनही केले. मदतीचे आश्वासन दिले.
चिखलीत पशु वैद्यकीय दवाखाना उभारणार
पशु वैद्यकीय सेवेसंबंधी माध्यमांशी बोलताना मंत्री निळकंठ हळर्णकर यांनी चिखली येथे पशुसंवर्धन खात्याची जमीन असल्याचे सांगून या ठिकाणी पशुंवरील उपचारांसाठी पशु वैद्यकीय चिकित्सा केंद्र उभारण्यात येणार असल्याची माहिती दिली. लोकांमध्ये या हॉस्पिटलबाबत गैरसमज असण्याची शक्यता आहे. मात्र, हे एक उपचार केंद्र असल्याने त्याचा कुणालाही त्रास होणार नाही. लोकांना या सेवेची गरज आहे. लोकांकडून अशी मागणी होत आहे असे मंत्री हळर्णकर म्हणाले. भटक्या गुरांची काळजी वाहण्यासाठी सरकारी योजना उपलब्ध आहेत. स्थानिक पालिकांनी बिगरसरकारी संस्थांच्या सहकार्याने हे सेवाकार्य करायला हवे. गुरांना रस्त्यांवरून उचलून गोशाळेत पाठवण्यासाठी वाहन हवे असल्यास ते खरेदी करण्यासाठी 23 लाख रूपये पालिकेला मंजूर करते. या योजनांचा काही पालिका लाभ घेतांत असे मंत्री म्हणाले.
जेटीवरील गाळ उपसण्याबाबत जुझे फिलिप डिसोजा यांनी व्यक्त केला धोका
दरम्यान, माजीमंत्री व अखिल गोवा ट्रॉलर मालक संघटनेचे अध्यक्ष जुझे फिलिप डिसोजा यांनी खारवीवाडा भागातील मच्छिमारी जेटीजवळ चाललेल्या गाळ उपसण्याच्या कृतीला आक्षेप घेतला आहे. या गाळ उपसण्याने तात्पुरत्या स्वारूपाच्या असलेल्या जेटीलाही धोका निर्माण होणार आहे. गाळ उपसण्याने नवीन उभारल्याससुध्दा कोसळणार आहे. त्यामुळे सरकारने हा प्रकार त्वरीत थांबवावा अशी मागणी केली. मंत्री हळर्णकर यांच्याकडेही त्यांनी ही समस्या मांडली. एकूण स्थिती पाहता सरकार खारवीवाडा येथे मच्छिमारांसाठी नवीन जेटी बांधून देतील असे आपल्याला वाटत नाही असे जुझे फिलिप डिसोजा यांनी म्हटले आहे.
आमदार संकल्प आमोणकरांकडून निवेदन सादर
काही मच्छिमारांनी आमदार संकल्प आमोणकर यांच्या मार्गदर्शनाखाली मंत्री निळकंठ हळर्णकर यांची भेट घेतली. आमदार आमोणकर यांनी मच्छिमारांच्यावतीने मंत्र्याकडे मच्छिमारांच्या विविध समस्यांसंबंधी निवेदन सादर केले. मच्छिमारांच्या या समस्या प्राध्यान्याने सोडवाव्यात अशी मागणी आमदार संकल्प आमोणकर यांनी मंत्र्यांकडे केली.