पॅनिक होऊ नये, लवकरच पुन्हा सेवेत येईन
प्रतिनिधी/ कराड
राज्याचे सहकारमंत्री व जिल्हय़ाचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील हे कोरोनावरील उपचारांसाठी मंगळवारी मुंबईत ब्रीच कॅण्डी हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. सकाळी येथील कृष्णा रूग्णालयातून रूग्णवाहिकेतून त्यांना मुंबईला नेण्यात आले होते. दरम्यान, सोमवारी रात्री पाटील यांनी कृष्णा रूग्णालयातून व्हिडीओद्वारे, आपली प्रकृती ठिक असून लवकरच आपल्या सेवेत पुन्हा हजर होईन, असा संदेश दिला होता.
आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सोमवारी कृष्णा रूग्णालयास भेट देऊन मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी टोपे यांनी त्यांना अधिक खबरदारी म्हणून मुंबईला ब्रीच कॅण्डीमध्ये उपचार घेण्याचा आग्रह केला. बाळासाहेब पाटील हे मुंबईला जाण्यास तयार नव्हते. मात्र आरोग्य मंत्र्यांनी आग्रह केल्याने ते मंगळवारी सकाळी रूग्णवाहिकेतून रवाना झाले. कराड पोलिसांचे पथकही त्यांच्याबरोबर होते. दुपारी मुंबईत पोहचल्यानंतर ब्रीच कॅण्डीमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले.
सोमवारी रात्री मंत्री बाळासाहेब पाटील यांनी रूग्णालयातून व्हिडीओ संदेश दिला. गेले पाच महिने कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. केंद्र आणि राज्य शासनाच्या वतीने अनेक उपाययोजना सुरू आहेत. या परिस्थीत लॉकडाऊन सुरू आहे. सहकार पालकमंत्री या नात्याने मी समाजामध्ये सातत्याने वावरत होतो. आवश्यक ती खबरदारी घेतली होती. मात्र गेल्या सोमवारी त्रास सुरू झाला. 14 रोजी कोविड चाचणी केली. ती पॉझिटिव्ह आली. त्यानंतर कृष्णा रूग्णालयात उपचारासाठी दाखल झालो. डॉ. सुरेश भोसले, डॉ. ए. वाय. क्षीरसागर, डॉ. संजय पाटील, डॉ. व्ही. सी. पाटील, डॉ. वर्गीस व नसिग यांनी चांगल्या प्रकारची दक्षता घेतली. उपचारांनी प्रकृतीत सुधारणा झाली. राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी काल कृष्णा रूग्णालयात भेट दिली होती. त्यांनी विनंती केल्याने मी उपचारासाठी मुंबईला जात आहे. आपणा सर्वांचे प्रेम आणि सदिच्छा यामुळे प्रकृतीत सुधारणा होत आहे. त्यामुळे कोणीही पॅनिक होऊ नये, घाबरू नये. लोकांनी सुरक्षित अंतर ठेवणे, मास्क वापराणे आवश्यक आहे. मुंबईत काही दिवस उपचार घेतल्यानंतर पुन्हा तुमच्या सेवेत येईन, असे पालकमंत्र्यांनी आपल्या व्हिडिओ संदेशात म्हटले आहे. कृष्णाचा स्टाफ चांगल्या प्रकारचे काम करत आहे. त्यांचे आभार मानतो.