प्रकृती ठिक पण खबरदारी म्हणून हलवणार, कराड कॉटेज अंशत: कोविड करणार
प्रतिनिधी/ कराड
राज्याचे सहकार व पणन मंत्री तथा जिल्हय़ाचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांची प्रकृती ठिक आहे. मात्र अधिक खबरदारी म्हणून त्यांना मंगळवारी मुंबईच्या ब्रीच कॅण्डी रूग्णालयात हलवण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी पत्रकारांना दिली.
मंत्री राजेश टोपे यांनी इस्लामपूरला जाताना कृष्णा रुग्णालयास भेट देऊन पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी जिल्हाधिकारी शेखर सिंह, जसराज पाटील, कृष्णा रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉ. ए. वाय. क्षीरसागर यांची उपस्थिती होती. आरोग्य मंत्र्यांनी कृष्णाचे डॉक्टर्स तसेच जसराज पाटील यांच्याकडून बाळासाहेब पाटील यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.
पत्रकारांशी बोलताना मंत्री टोपे म्हणाले की, पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांची प्रकृती ठिक आहे. काही अडचण नाही. सर्व पॅरामीटर नॉर्मल आहेत. मात्र त्यांना मधुमेह आणि रक्तदाब आहे. त्यामुळे रुग्णालयाचे डॉक्टर्स, जसराज पाटील व कुटुंबीय, जिल्हाधिकारी व आम्ही चर्चा करून त्यांना मंगळवारी सकाळी 7.30 पर्यंत मुंबईला ब्रीच कॅण्डी रुग्णालयात हलवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांची प्रकृती नॉर्मल आहे. मात्र अधिक काळजी घेण्यासाठी आम्ही त्यांना मुंबईला हलवणार आहोत.
कराड कॉटेजच्या काही भागात कोविड कक्ष करणार
कराड येथील सौ. वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयाच्या काही भागात कोविड हॉस्पिटल सुरू करण्यात येणार आहे. येथे व्हेंटिलेटर्सची कमतरता आहे. ती पूर्ण केली जाईल. आयसीयु बेडचीही कमतरता भासणार नाही, असे टोपे यांनी सांगितले.
जिल्हय़ाला आणखी व्हेंटिलेटर्स देण्याच्या सूचना
जिल्हय़ात व्हेंटिलेटर्सचा तुटवडा असल्याने आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आरोग्य संचालिका डॉ. अर्चना पाटील यांच्याशी संपर्क साधत, इतर जिल्हय़ातील तसेच केंद्र सरकारकडून येणाऱया व्हेंटिलेटर्सपैकी काही व्हेंटिलेटर्स प्राधान्याने सातारा जिल्हय़ाला व कराडला देण्याच्या सूचना केल्या.
सातारा ते कराड प्रवासात जिल्हय़ाचा घेतला आढावा
आरोग्यमंत्री राजेश टोपे हे इस्लामपूरला निघाले होते. साताऱयाहून कराडला येताना त्यांनी गाडीत जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्याकडून जिल्हय़ातील उपाययोजनांचा आढावा घेतला. जिल्हय़ात परिस्थिती नियंत्रणात असून जिथे कमतरता आहे, त्या पुरवल्या जातील, असे त्यांनी सांगितले..