प्रतिनिधी/ म्हापसा
लॉकडाऊनमुळे कळंगूट मतदारसंघात बिगर गोमंतकीय मोठय़ा प्रमाणात अडकून पडले असून त्यांच्याकडे पैसेही शिल्लक नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची पाळी आली आहे हे लक्षात घेऊन कळंगूटचे आमदार तथा कचरा व्यवस्थापन मंत्री मायकल लोबो यांनी पुढाकार घेऊन शुक्रवार दि. 3 एप्रिल पर्यंत 1500 मजुरांना दुपारी व रात्रीच्या जेवणाची व्यवस्था केली आहे. कळंगूटच्या सेवाभावी संस्थानी व नागरिकांनी स्वखुशीने ज्यांना कुणाला या मजुरांना जेवण द्यायचे असेल त्यांनी कळंगूट असोसिएशन हॉलमध्ये वा कळंगूट पंचायत मंडळ अथवा आपल्याकडे संपर्क साधावा असे आवाहन केले आहे.
लॉकडाऊन संपेपर्यंत येत्या 14 एप्रिल पर्यंत सर्व अडीच हजार मजुरांना दोन्ही वेळचे जेवण देण्याची सोय करण्यात येणार असल्याची माहिती मंत्री लोबो यांनी दिली आहे. यात काहीही राजकारण नसून मानवतेच्या दृष्टीकोनातून हे आपण करीत असल्याचे मंत्री लोबो यांनी स्पष्ट केले. कळंगूट मतदारसंघात विविध हॉटेल्स तसेच आस्थापनात काम करणाऱया मजुरांची विविध ठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे. सदर मजूर मतदारसंघात विविध ठिकाणी भाडेपट्टीवर रहात होते. या आकडय़ात दिवसेंदिवस भर पडत आहे. कळंगूट, कांदोळी पंचायत क्षेत्रात त्यांची जेवणाची व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती मंत्री मायकल लोबो यांनी दिली. या योजनेसाठी राज्य सरकारकडून सहकार्य लाभत असल्याचे ते म्हणाले. तसेच काही हॉटेल्सकडूनही सहकार्य दिले जात असल्याची माहिती दिली.