प्रतिनिधी/ वास्को
मुरगाव बंदरात खनीज चोरी झाल्याचा दावा करून त्यात नगरविकासमंत्री मिलिंद नाईक यांना गुंतवण्याचा प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष संकल्प आमोणकर यांचा प्रयत्न केवळ मंत्री आणि भाजपा व सरकारची बदनामी करण्यासाठीच असून मिलिंद नाईक आतापर्यंत केवळ जनतेसाठी कार्य करत आलेले आहेत. त्यामुळेच जनतेने त्यांना तीन वेळा निवडून दिलेले आहे असे स्पष्ट करून मुरगाव भाजपा मंडळाने संकल्प आमोणकर यांच्याविरूध्द कायदेशीर कारवाई करण्यासाठी पावले उचलणार असल्याचे म्हटले आहे.
प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष संकल्प आमोणकर यांनी नुकताच मुरगाव बंदरात खनीज चोरी झाल्याचा व या चोरीत मंत्री मिलिंद गुंतलेले असल्याचा आरोप केला होता. या आरोपांची गंभीर दखल मुरगाव भाजपा मंडळाने घेतली आहे. मंडळाने घेतलेल्या पत्रकार परिषदेत आमोणकर यांनी केलेले आरोप पूर्णपणे खोटे असल्याचे स्पष्ट करण्यात आले. मंत्री मिलिंद नाईक यांचे मुरगाव बंदरात होणारे व्यवहार पूर्णपणे कायदेशीर असल्याचे मंडळाचे अध्यक्ष संजय सातार्डेकर यांनी म्हटले आहे. मंत्री नाईक यांना खासगी व्यवसाय करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य असून त्यात काहीच चुकीचे नाही. मात्र, त्यांच्यावर खनीज चोरीचा आरोप करून त्यांना नाहक बदनाम करण्याचा प्रयत्न आमोणकर यांच्याकडून होत आहे. त्याचबरोबर भाजपा आणि सरकारलाही बदनाम करण्यात येत असल्याने मुरगाव मंडळाने या आरोपांची दखल घेतल्याचे संजय सातार्डेकर यांनी स्पष्ट केले. आमोणकर हे वैफल्यग्रस्त झालेले आहेत. आतापर्यंत त्यांनी मंत्री नाईक यांच्याविरूध्द अनेक वेळा नाहक आरोप केलेले आहेत. मंत्री नाईक यांच्यावरील एकही आरोप ते पुराव्यानीशी सिध्द करू शकलेले नाहीत. संकल्प आमोणकर यांनी आता मर्यादा ओलांडलेली आहे. आता आम्ही गप्प राहणार नाही. मंत्री मिलिंद नाईक व भाजपा मंडळाला आमोणकर यांच्या राजकारणाची दखल घेण्यासाठी खरे तर वेळ नसतो. आम्ही जनतेच्या कामांना अधिक प्राधान्य देतो. परंतु आता आमोणकर यांच्याविरूध्द कायदेशीर कारवाई हाती घ्यावीच लागणार असल्याचे सातार्डेकर स्पष्ट केले.
माजी नगरसेवक शशिकांत परब यांनीही संकल्प आमोणकर यांनी मंत्री नाईक यांच्याविरूध्द खालच्या पातळीवरचे आरोप केल्याचे सांगितले. आमोणकर मंत्री मालिंद नाईक यांच्याविरोधात दोन वेळा निवडणुक हरलेले आहेत. त्यामुळे ते खोटारडेपणाचे आरोप करीत आहेत. त्यांनी अशा प्रकारे खालच्या पातळीवरचे राजकारण न करता स्वत:च्या कुवतीवर राजकीय यश प्राप्त करावे असा सल्ला परब यांनी आमोणकर यांना दिला. माजी नगरसेवक मुरारी बांदेकर यांनी मंत्री मिलिंद नाईक केवळ जनतेसाठी सतत कार्यरत राहणारे राजकारणी असून त्यांनी आतापर्यंत मुरगावात अनेक विकास कामे केलेली आहेत. एकेकाळी आपणही मंत्री नाईक यांच्यावर खोटे आरोप केले होते. त्याची आपल्याला जाणीव झालेली आहे. त्यामुळेच आपण मंत्री नाईक यांच्यासोबत आहे. संकल्प आमोणकर यांनी नाहक आरोप करण्यापेक्षा विधायक विरोधकाची भुमीका बजावावी असे मुरारी बांदेकर म्हणाले. माजी नगरसेवक लियो रॉड्रिक्स व दामू कासकर यांनीही या पत्रकार परिषदेत मंत्री मिलिंद नाईक यांच्या कार्यपध्दतीचे कौतुक करून संकल्प आमोणकर यांच्याकडून करण्यात येणाऱया आरोपांबद्दल संताप व्यक्त केला. या पत्रकार परिषदेला ज्येष्ठ भाजपा पदाधिकारी प्रसाद प्रभुगावकर उपस्थित होते.