प्रतिनिधी / इचलकरंजी
गोकुळ दूध संघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व पालकमंत्री सतेज पाटील यांनी माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे व आमदार प्रकाश आवाडे यांची त्यांच्या इचलकरंजीतील निवासस्थानी भेट घेतली. दोन्ही नेत्यांनी आवाडे पिता-पुत्रांनी गोकुळ दूध संघ निवडणुकीत राजर्षी शाहू शेतकरी आघाडीला पाठिंबा द्यावा, यासाठी विनंती केली.
गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत हातकणंगले आणि शिरोळ तालुक्यातील भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या दोन्ही तालुक्यात आवाडे गटाचे अनेक गावांमध्ये वर्चस्व आहे. या पार्श्वभूमीवर मंत्री श्री मुश्रीफ व श्री पाटील यांनी आज त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन सुमारे पस्तीस मिनिटे चर्चा केली. स्वतंत्रपणे निवडणूक लढवणे ऐवजी राजर्षी शाहू शेतकरी आघाडीला पाठिंबा जावा असा आग्रह आवाडे यांना यावेळी करण्यात आला. बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना आमदार श्री आवाडे यांनी उद्या छाननी होणार आहे. त्यानंतर पुढील आठवड्यात आम्ही आमची भूमिका स्पष्ट करू असे सांगितले.
यावेळी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक विलासराव गाताडे, प्रकाश सातपुते, नगरसेवक संजय कांबळे, प्रकाश मोरे, नगरसेवक मदन कारंडे, नगरसेवक प्रकाश पाटील, अमित गाताडे, बाळासो कलागते, शशांक बावचकर, पंचायत समितीचे माजी सभापती महेश पाटील. आदी उपस्थित होते.