प्रतिनिधी / कोल्हापूर
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रीमंडळातील कॅबिनेट मंत्री हसन मुश्रीफ, राज्यमंत्री सतेज पाटील, डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांचे अमाप उत्साहात करवीर नगरीत स्वागत करण्यात आले. मंत्र्यांच्या स्वागतासाठी आलेल्या कार्यकर्त्यांमध्ये रखरखत्या उन्हातही सळसळता उत्साह होते. महापौर ऍड. सूरमंजिरी लाटकर यांनी पुष्पगुच्छ देऊन मंत्र्यांचे स्वागत केले. यावेळी एकच जोष आणि जल्लोषात महाविकास आघाडीच्या जयघोषाने शाहू नगरी दुमदुमली होती.
सकाळी साडेअकरा वाजता मंत्री हसन मुश्रीफ, सतेज पाटील, राजेंद्र पाटील यड्रावकर यांचे करवीर संस्थापीका छत्रपती ताराराणी चौक येथे आगमन झाले. मंत्र्यांच्या वाहनाच्या ताफ्यावर तोफेतील पुष्पवृर्टी सलामी देण्यात आली. यावेळी फटाक्यांची आतषबाजी आणि गगनभेदी घोषणबाजीने आसमंत दुमदुमले. मंत्री असलेल्या गाडीला कार्यकर्त्यांनी गराडा घालत फुलांनी सजवलेल्या टेंम्पो पर्यंत खांद्यावर उचलून नेले. महापौर ऍड. सूरमंजिरी लाटकर यांनी तिनही मंत्र्यांचे करवीरच्या जनतेच्यावतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. छत्रपती ताराराणी यांच्या पुतळय़ास अभिवाद करुन मिरवणुकीस प्रारंभ झाला. मंत्र्यांसमवेत सजवलेल्या वाहनात खासदार धैर्यशील माने, संजय मंडलिक, आमदार राजुबाबा आवळे, चंद्रकांत जाधव, महापौर सूरमंजिरी लाटकर, उपमहापौर संजय मोहिते, जिल्हा परषदेचे अध्यक्ष बजरंग पाटील, उपाध्यक्ष सतीश पाटील, बाजार समितीचे सभापती दशरथ माने, प्रतिमा सतेज पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, माजी आमदार के. पी. पाटील, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय देवणे, आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे उपाध्यक्ष संजय पवार, शहराध्यक्ष आर. के. पोवार, प्रल्हाद चव्हण उपस्थित होते. मिरवणूक मार्गावरील वटेश्वर मंदिर येथील दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी, व्हीनस कॉर्नर येथील छत्रपती राजाराम महाराज पुतळा, दसरा चौक येथील लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांच्या पुतळय़ास पुष्पहार अर्पन करुन अभिवाद करण्यात आले.
आमदार ऋतुराज पाटील कार्यकर्त्यांच्या गराडय़ात
मिरवणुकीत आमदार ऋतुराज पाटील मंत्र्यांसमवेत न रहाता कार्यकर्त्यांच्या समवेत चालत सहभागी झाले होते. कार्यकर्त्यांच्या गराडय़ात संपूर्ण मिरणूक मार्गा त्यांनी पायी पूर्ण केला. त्यांच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी तरुणांची गर्दी होती.
पदाधिकाऱयांनी धरला ठेका
मिरवणुकीत कार्यकर्त्यांसह दुसऱया फळीतील नेत्यांचाही उत्साहाला उधान आले होते. कार्यकर्त्यांसमवेत त्यांनीही धनगरी ढोलाच्या तालावर ठेका धरला होता. महापौरांचे पती राष्ट्रवादीचे माजी शहराध्यक्ष राजेश लाटकर, माजी नगरसेवक सचिन चव्हाण, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शशीकांत खोत यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, नगरसेवकांनी धरेला ठेका लक्ष वेधून घेत होता.
पारंपारिक वाद्यांचा गजर
मिरवणुकीत पारंपारिक वद्या लक्षवेधी होती. धनगरी ढोल, बेंजो, हलगी, लेझीम, झांजपथक आदी वाद्यांच्या गजरांनी मिरवणूक मार्ग दुमदुमला होता.