प्रतिनिधी / बेळगाव
मंथन कल्चरल अँड सोशल वेल्फेअर सोसायटी बेळगावतर्फे कवयित्री शांता शेळके यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त ‘…तरी असेल गीत हे,’ हा कार्यक्रम 1 फेब्रुवारी रोजी झाला.
कार्यक्रमाची संकल्पना लेखन आणि निवेदन आशा कुलकर्णी यांचे होते. संगीत दिग्दर्शन अर्चना बेळगुंदी यांचे तर संवादिनी साथ सारंग कुलकर्णी आणि तबलासाथ नारायण गणाचारी यांची होती.
प्रारंभी शांता शेळके यांच्या ‘गणराज रंगी नाचतो’ या गीतावर अक्षता पिळणकर यांनी नृत्य सादर केले. दिग्दर्शन त्यांचे स्वतःचे होते. विशाखा देशपांडे, उर्मी शेरीगार, तन्वी इनामदार, निधी केळकर, राजश्री हेब्बाळकर यांनी शांता शेळके यांच्या अनेक गीतांचे सुरेल गायन केले.
शांता शेळके यांच्या, ‘मी डोलकर डोलकर डोलकर दर्याचा राजा’ या कोळी गीतावर मंथन भगिनींनी बहारदार नृत्य सादर केले .या नृत्याचे दिग्दर्शन सुनील नांगरे यांनी केले होते. नृत्यामध्ये विद्या हंगिरगेकर, सुप्रिया पवार, बबीता पवार, शिल्पा रेवणकर, संगीता कौजलगी, कविता जाधव, मोनाली परब, अनुराधा जाधव ,वैशाली मुचंडी व संगीता नांगरे यांचा सहभाग होता. शांता शेळके यांच्या ‘मराठी पाऊल पुढे’ या सुप्रसिद्ध समूहगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
कार्यक्रमाचे नेटके निवेदन करत आशा कुलकर्णी यांनी शांता शेळके यांच्या साहित्य प्रवासाचा आढावा घेऊन त्यांना आदरांजली व्यक्त केली. सदर कार्यक्रमास राज्य मराठी विकास संस्था मुंबई, यांच्या बृहन्महाराष्ट्र मंडळांना अर्थसहाय्य योजनेखाली अनुदान प्राप्त झाले होते.