वार्ताहर/ कराड
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी गेल्या पाच महिन्यांपासून राज्यासह देशभरातील मंदिरे बंद आहेत. त्यामुळे शासनाने तातडीने मंदिरे खुली करावीत, या मागणीसाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने दत्त चौकातील दत्त मंदिरासमोर घंटानाद आंदोलन करण्यात आले.
सहकार परिषेदेचे महाराष्ट्र राज्य संयोजक शेखर चरेगावकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर व शहराध्यक्ष एकनाथ बागडी यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी नगरसेवक सुहास जगताप, जिल्हा चिटणीस नितीन वास्के, रुपेश मुळे, मुकुंद चरेगावकर, नितीन शाह, सुनील नाकोड, प्रमोद शिंदे, समाधान चव्हाण, विश्वनाथ फुटाणे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
कोरोनामुळे राज्यात लॉकडाऊन करण्यात आले होते. परिणामी सर्व उद्योगधंदे, व्यवसाय, व्यापारीपेठा, मार्केट व मंदिरेही बंद ठेवण्यात आली होती. दरम्यान, शासनाच्या माध्यमातून लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणल्याने बहुतांश उद्योगधंदे पूर्ववत सुरू होत असून बाजारपेठाही सुरू झाल्या आहेत. त्यामुळे शासनाने आता सर्व मंदिरे खुली करण्याची भाजपच्या वतीने मागणी करण्यात आली आहे.