यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसीचा सन्मान
ओटवणे / प्रतिनिधी:
जागतिक फार्मासिस्ट दिनाचे औचित्य साधून सावंतवाडी येथील यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसीचा यावर्षीचा फार्मसिस्ट ऑफ दि इयर २०२१ हा सन्मान सावंतवाडी येथील कशाळीकर मेडीकलचे मालक मकरंद कशाळीकर यांना शनिवारी मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला.यावेळी व्यासपिठावर श्री यशवंतराव भोसले एज्युकेशन सोसायटीचे सचिव संजीव देसाई, जिल्हा केमिस्ट ड्रगिस्ट असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष आनंद रासम, तालुकाध्यक्ष विनायक दळवी, तालुका सचिव संतोष राणे, भोसले नॉलेज सिटीच्या प्रशासकीय अधिकारी सुनेत्रा फाटक, प्राचार्य डॉ. विजय जगताप, डी. फार्मसी प्राचार्य सत्यजित साठे, रजिस्ट्रार प्रसाद महाले, जनसंपर्क अधिकारी नितीन सांडये आणि केमिस्ट बांधव उपस्थित होते. मकरंद कशाळीकर यांनी मिरज येथील इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी मेडिकल सेंटर मधुन १९८८ मध्ये डिप्लोमा फार्मसी केला. त्यानंतर सावंतवाडीत कशाळीकर मेडिकल सुरू करून ते १९८९ पासून गेली ३२ वर्षे फार्मसी क्षेत्रात आहेत. सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट केमिस्ट व ड्रगिस्ट असोसिएशनच्याउपाध्यक्षपदी आणिसावंतवाडी तालुका केमिस्ट व ड्रगिस्ट असोसिएशनच्या तालुकाध्यक्षपदी प्रत्येकी सहा वर्ष काम करताना त्यांनी केमिस्ट बांधवांच्या समस्या सोडविल्या. तसेचअसोसिएशनच्या माध्यमातून रुग्णांच्या सोयीसाठी विविध प्रकारच्या आरोग्य शिबिरांचे आयोजन केले.
ऑल इंडिया फार्मसी कौन्सिल महाराष्ट्र स्टेट फार्मसी कौन्सिल गोवा स्टेट फार्मसी कौन्सिल आयोजित सेमिनार कम रिफ्रेशर कोर्स मध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याचे त्यांनी प्रतिनिधित्व केलें. रिटेल फार्मासिस्ट व सामान्य रुग्ण त्यांच्यामधील नातेसंबंध घट्ट करणे, पेशंट कौन्सिलिंग द्वारे जागरूकता करण्यात त्यांनी नेहमीच प्राधान्य दिले. त्यांची पत्नी सौ शिल्पा डी फार्मसी असून मुलगी तन्वी बी फार्मसी, एम फार्म, पेटंट इन लॉ ( डिप्लोमा) आहे. तर मुलगा वेदांग याचा बी.फार्म करण्याचा मानस आहे.
मकरंद कशाळीकर यांचे फार्मसी क्षेत्रातील योगदान लक्षात घेउन त्यांची या पुरस्कारसाठी निवड करण्यात आली.यावेळी व्यासपीठावरील उपस्थित सर्व मान्यवरांनी मकरंद कशाळीकर यांच्या फार्मसी क्षेत्रातील योगदानाचे कौतुक करीत त्यांचा फार्मसिस्टनी आदर्श घ्यावा असे आवाहन केले. यावेळी मकरंद कशाळीकर यांनी माझे सर्व शिक्षक, कशाळीकर कुटुंबिय, कर्मचारी, केमिस्ट संघटना, फार्मास्युटिकल डिस्ट्रीब्यूटरचे सर्व मालक व कर्मचारी, डॉक्टर व ग्राहक यांचे सहकार्य व पाठबळामुळेच आपण गेली ३२ वर्षे या व्यवसायात यशस्वी झाल्याचे सांगितले.