प्रियोळमधून दीपक तर मडकईतून सुदिन ढवळीकर
प्रतिनिधी /पणजी
महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाने 10 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली असून निवडणूक परंपरेनुसार प्रियोळ या मतदारसंघातून दीपक ढवळीकर आणि मडकईतून सुदिन ढवळीकर यांनाच उमेदवारी देण्यात आली आहे.
मगोप-तृणमूल काँग्रेस या दोन पक्षांची निवडणूकपूर्व युती असल्यामुळे मगोपच्या या दहा मतदारसंघात तृणमूल काँग्रेसचे उमेदवार असणार नाहीत तथापि तेथे भाजप, काँग्रेस, गोवा फॉरवर्ड या पक्षांचे उमेदवार रिंगणात असल्यामुळे तेथे मगो उमेदवारांना वरील पक्षांशी दोन हात करावे लागणार आहेत. म्हणजेच तिरंगी लढतीला मगोला तोंड द्यावे लागणार अशी चिन्हे दिसत आहेत.
मगोपचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी सदर यादी जाहीर केली असून उर्वरित उमेदवार यादी शनिवारी घोषित होणार असल्याचे सांगण्यात आले. भाजपच्या विरोधात एकास-एक उमेदवार उभा रहाणार नसल्याचे समोर येत असून बहुरंगी लढती होतील, असे चित्र दिसून येत आहे.