सुदिन ढवळीकरांनी दिले संकेत : अधिकृत घोषणा लवकरच
प्रतिनिधी /फोंडा
मगो-तृणमूल युतीमध्ये आणखी एक पक्ष सहभागी होत असून येत्या 10 जानेवारीला त्यासंबंधी अधिकृत घोषणा होणार आहे. मगो पक्षाने सध्या जागांवर 12 संभाव्य उमेदवार जाहीर केले आहेत. निवडणुकीची आचारसंहिता लागू होताच, उमेदवारांची अंतिम यादी जाहीर होणार आहे. येणाऱया निवडणुकीत परिवर्तन निश्चितच घडणार असून गोव्यात नवीन सकाळ उजाडणार असल्याची घोषणा मगो पक्षाचे नेते आमदार सुदिन ढवळीकर यांनी केली.
खांडेपार येथे पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी मगो-तृणमूलमध्ये आणखी एक पक्ष सहभागी होत असल्याचे संकेत दिले. मात्र हा पक्ष कुठला असेला हे आत्ताच जाहीर करता येणार नाही, असेही ते म्हणाले. भाजपाने यापूर्वी मगो पक्षाचे आमदार पळविले आता उमेदवार पळवित आहेत. पेडणेतून आमचा एक उमेदवार पळविला तरी अजून चार उमेदवार तयार आहेत. ज्यांनी पक्षाशी दगाबाजी केली, त्यांचा पराभव निश्चित आहे. यापूर्वी मगो सोडून भाजपात गेलेले आमदार पुन्हा पक्षात येऊ पाहत आहे. पण फुटीरांना पुन्हा पक्षात जागा नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. तृणमुलशी युती केल्यानेच आपण मगो पक्ष सोडून भाजपात प्रवेश केल्याचा प्रवीण आर्लेकर यांचा दावा खोटा आहे, असल्याचे ढवळीकर म्हणाले. यापूर्वी बेळगाव येथे सर्व संभाव्य उमेदवारांसोबत झालेल्या बैठकीत आर्लेकरांसह सर्व उमेदवारांनी युतीसाठी सहमती दर्शविली होती. तसे लेखी देऊन केंद्रीय समितीचा निर्णय त्यांनी मान्य केला होता. आज तेच आर्लेकर खोटा दावा करून लोकांची दिशाभूल करीत आहेत.
कार्यकर्त्यांची मोठी फौज असूनही भाजपाला उमेदवार मिळून हे दुर्दैव
भाजपाकडे साडेचार लाख कार्यकर्ते आहेत. एवढय़ा प्रचंड संख्येने कार्यकर्ते असूनही भाजपाला एकही उमेदवार मिळू नये हे या राष्ट्रीय पक्षाचे दुर्दैव आहे. भाजपाकडे राज्यात सक्षम नेतृत्व नाही, हेच त्यातून सिद्ध होत आहे. कार्यकर्त्यांना अनेक वर्षे राबवून घेणे व आयत्यावेळी इतर पक्षातील आयात उमेदवारांना तिकिट देणे ही अधोगती आहे, अशी टिकाही त्यांनी केली. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांनी मगो पक्ष हा ढवळीकरांची प्रायव्हेट कंपनी असल्याच्या आरोपाचाही त्यांनी समाचार घेतला. पक्षाच्या नावावर तानावडे गेली तीन वर्षे कोणकोणते खासगी धंदे करतात, याचा हिशेब चुकता करावा लागेल, असा इशाराही त्यांनी दिला. युतीसंबंधी जाहीर नाम्याविषयी बोलताना युतीचा जाहीरनामा वेगळा व मगो पक्षाचा प्रत्येक मतदारसंघातील जाहीरनामा वेगळा असेल अशी माहिती त्यांनी दिली.
यावेळी बांदोडा जिल्हा पंचायत सदस्य गणपत नाईक, कवळेचे सरपंच राजेश कवळेकर, बांदोडाचे सरपंच राजेश नाईक, वाडीतळावलीचे सरपंच दिलेश गावकर, दुर्भाट आगापूरच्या सरुजा नाईक, कुंडईचे विश्वास फडते, मडकईच्या सरपंच लक्ष्मी तारी वळवईकर, मिथील ढवळीकर, केंद्रीय समितीचे सदस्य नरेश गावडे हे उपस्थित होते.
शनिवारी फोडणार मडकईत प्रचाराचा नारळ
आमदार सुदिन ढवळीकर यांनी मडकई मतदारसंघातून शनिवार 8 रोजी प्रचाराचा नारळ फोडणार असल्याचे यावेळी जाहीर केले. शनिवारी सकाळी 9 वा. श्री महालक्ष्मी देवीचे दर्शन घेऊन प्रचाराचा नारळ ठेवला जाईल. त्यानंतर फर्मागुडी येथील श्री कटमगाळ दादा, मडकईतील श्री नवदुर्गा देवी व आम्रेश्वर या दैवतांना श्रीफळ ठेवून प्रचाराला सुरुवात होणार आहे. दुपारी फर्मागुडी येथील फार्महाऊसमध्ये छोटेखानी सभा होईल यावेळी मडकई मतदारसंघातील जिल्हा पंचायत सदस्य, सरपंच, पंचसदस्य, कार्यकर्ते व हितचिंतक मोठय़ा संख्येने उपस्थित राहणार आहेत. राज्यातील विविध मतदारसंघातील प्रचार कार्यात आपण व्यस्त राहणार असल्याने मडकईतील प्रचाराची जबाबदारी युवा नेते मिथील ढवळीकर, आपले बंधू दिलीप ढवळीकर तसेच सरपंच, पंचसदस्य व कार्यकर्त्यांवर सोपवलेले आहे. यापूर्वी मडकईतील मतदारांनी आपल्यावर विश्वास ठेवून ज्या भरघोस मतांनी निवडून दिले तसाच विक्रम येणाऱया निवडणुकीतही होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.