भूमिपुत्र विधेयकामागील कटकारस्थानी : मंत्र्यांचा राजीनामा घ्यावा
वार्ताहर / मडकई
भूमिपुत्र विधेयकाला प्रखर विरोध असतानाही सरकारने सत्तेच्या बळावर विधानसभेत हे विधेयक चर्चेविना संमत करून मूळ गोमंतकीयांचा अवमान केलेला आहे. या कटकारस्थानात पाच मंत्री व सरकारी अधिकाऱयांचा सहभाग आहे. भूमिपुत्रांचा अवमान मगो पक्ष कादापी सहन करणार नाही. या कटकारस्थना मागील पाचही मंत्र्यांचा मुख्यमंत्र्यांनी त्वरीत राजीनामा मागून घ्यावा व संबंधीत सरकारी अधिकाऱयांना निलंबित करावे, अशी मागणी मगो पक्षाचे ज्येष्ठ नेते आमदार सुदिन ढवळीकर केली आहे.
फर्मागुडी येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते. भूमिपुत्रांचे विधेयक निवड समितीकडे पाठवावे अन्यथा त्यावर चर्चा करावी, अशी विनंती सभापती राजेश पाटणेकर व मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना विरोधकांनी केली होती. मात्र सत्तेच्या जोरावर भाजपा सरकारने रातोरात हे विधेयक संमत करून घेतले. भूमिपुत्रांवर हा अन्याय आहे व तो होऊ दिला जाणार नाही, असे ढवळीकर म्हणाले.
संपूर्ण गोव्यातून या विधेयकाला जोरदार विरोध झाल्यानंतर मुख्यमंत्री सावंत यांनी नाव बदलून त्यात सारवासारव केली आहे. पण हे विधेयक पुन्हा विधानसभेत आणले जाईल. त्यांचा हा प्रयत्न हाणून पाडू असेही ढवळीकर म्हणाले. गेल्या वीस तीस वर्षांपासून गोव्यात स्थायिक झालेल्या लोकांचे जर सरकार काही चांगले करू पाहत आहे, ते अवश्यक करावे. त्यासाठी जमीन हस्तांतरीत करून त्यांना त्यांचा हक्क मिळवून द्यावा. परंतु मूळ गोमंतकीयांच्या अस्थित्त्वाला धोका लावून हे करता येणार नाही. कुमेरी, आफ्रामेंत, मोकाशी या जमिनी 250 चौरस मिटरच्या नसून 10 हजार चौ. मिटरच्या वर आहेत. या जमीनीत कुळागरे व बागायती वसलेल्या आहेत. कदाचित 250 चौरस मिटरच्या जागेत घर असेल. मुळात या भूमिपुत्र विधेयकाचा अर्थच स्पष्ट होत नाही.
मंदिरापेक्षा पुरग्रस्तांना आधी मदत करा
वेर्णा येथील श्री महालसा देवीच्या मंदिर बांधकामास सरकार रु. 100 कोटी खर्च करण्यास तयार आहे. विधानसभेत आपण विचारलेल्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांनी हे उत्तर दिले आहे. मात्र ज्या भूमिपुत्रांची घरे पुरात जमीन दोस्त झाली. ज्यांचे संसार उघडय़ावर आले. त्यांना केवळ रु. 2 लाख मदत देऊन सरकार त्यांची थट्टा करीत आहेत. पूरग्रस्तांना भरीव मदत द्यावी लागेल. त्यासाठी रु. 100 कोटींची तरतूद करावी. देवी महालसा ही मगो पक्षाची कुलदेवी आहे. देवीच्या मंदिराचे बांधकाम अवश्य करावे, पण मानवतेवर ओढवलेल्या संकट निवारणाला प्राधान्य दिल्यास देवीचे आशिर्वाद मिळतील, असे ढवळीकर म्हणाले.
बाणस्तारी मार्केटचा जमीनीचा मुखत्यार हक्क कुठे ?
बोरी येथील अनुसूचीत जमातसाठी सभागृह बांधण्यात येणार आहे. मात्र जमिनीचा मुखत्यारी हक्क मिळेपर्यंत हे बांधकाम हाती घेता येणार नाही. विधानसभेत तसे उत्तर देण्यात आले आहे. बाणस्तारी येथे बांधण्यात आलेल्या मार्केट प्रकल्पाला जमिनीचा मुखत्यारी हक्क मिळाला आहे का हे सरकारने आधी भोम अडकोण पंचायतीला स्पष्ट करावे, अशी मागणीही ढवळीकर यांनी केली.
डॉ. भाटीकरांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध
मगो पक्षाचे फोंडय़ातील सभाव्य उमेदवार डॉ. केतन भाटीकर यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा ढवळीकर यांनी निषेध केला. फोंडय़ाचे पोलीस निरीक्षक मोहन गावडे यांनी या प्रकरणी योग्य दिशेने तपास केला नाही. डॉ. भाटीकर यांचे वैद्यकीय तपासणी करायला हवी होती. फोंडय़ाचे उपजील्हाधिकारी, पोलीस उपअधिक्षक यांनी आपल्याया कायदा शिकवू नये. या प्रकरणी योग्य तपास न झाल्यास, आम्ही गप्प बसणार नाही, असा इशाराही आमदार ढवळीकर यांनी दिला आहे.