भाजप,काँग्रेस पक्षाशी युती नाही-सुदिन ढवळीकर
प्रतिनिधी /म्हापसा
महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाबाबत आपण घरोघरी प्रचार व जागृती करणार असून राज्यातील काँग्रेस व भाजप या दोन्ही राष्ट्रीय पक्षांना राज्यातून हाकलून लावून जनतेने मगोला विजयी करावे. आम्ही 24 जागा स्वबळावर लढविणार असून यापैकी 18 जागांचे उमेदवार निश्चित झाले आहेत, असे मगो नेते तथा आमदार सुदिन ढवळीकर यांनी मयडे येथे सांगितले.
काल बुधवारी मयडे येथे रामा साटेलकर व महेश साटेलकर यांच्यावतीने गावातील नागरिकांना मोफत खत वाटप करण्यात आल्यानंतर ढवळीकर बोलत होते. मगो उमेदवार प्रवीण आर्लेकर, जीत आरोलकर, महेश साटेलकर, रामा साटेलकर, पंच सूर्यकांत भाटलीकर, पूजा च्यारी, माजी सरपंच संतोष च्यारी, प्रकाश राऊळ, बबन केरकर आदी उपस्थित होते.
मनापासून मगोला सहकार्य करा
वादळग्रस्तांना अद्याप नुकसान भरपाई मिळालेली नाही. सरकारची मदत म्हणजे मसाला 20 रुपयाचा आणि कोंबडी 20 रुपयाची अशी परिस्थिती सरकारची झाली आहे. युवा पिढीने आता पुढे येण्याची वेळ आलेली आहे. वयोवृद्धांना मगोबाबत सर्व माहीत आहे. युवा पिढीमध्ये मगोबाबत जाहीर प्रचार व्हायला पाहिजे. युनायटेड गोवन्स व भाऊसाहेब बांदोडकरांनी गोवा राज्य सांभाळले. त्यासाठी सर्वांनी मनापासून एकत्रित येऊन हे राज्य सांभाळण्यासाठी मगोला सहकार्य करावे, असेही ढवळीकर म्हणाले.
मगोबाबत कानाकोपऱयात जागृती करणार
क्रांतीदिनी आम्ही लोहिया मैदानावर गोवा राज्य स्वतंत्र करण्यासाठी डॉ. राम मनोहर लोहिया यांच्या पुतळय़ासमोर शपथ घेतली. राज्याच्या कोपऱयाकोपऱयात जाऊन मगो पक्ष म्हणजे काय याची जागृती करणार असून आम्हाला काँग्रेस वा भाजप हे दोन्ही पक्ष नको आहेत. या पक्षांबरोबर युती होणार नाही. आम्हाला स्वबळावर 21 आमदार निवडून द्या अन्यथा त्यांना निवडून द्या. पूर्वी काँग्रेस पक्ष तोडफोडीचे राजकारण करून आमचे आमदार नेत होता. आज घाऊक पद्धतीने भाजप काँग्रेस व मगोचे आमदार फोडून राजकारण करीत आहेत. हे कुठे तरी बंद व्हायला पाहिजे, असे राज्यातील प्रत्येक माणसाला वाटते आणि तोच विषय घेऊन जी क्रांती लोहिया मैदानावर झाली तीच क्रांती युवा पिढीला बरोबरीने घेऊन आपण करणार असल्याचा इशारा ढवळीकर यांनी दिला.
राज्यात नवीन क्रांती घडू शकते
महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाने राज्यात एकूण 18 जागांवर काम सुरू केले आहे. आम्ही 24 जागापर्यंत सहज जाऊ शकतो. यदा कदाचित चांगले समविचारी पक्ष आमच्या बरोबर आले, भाजप काँग्रेस पक्ष सोडून राज्यात नवीन क्रांती घडू शकते. युतीसाठी आम्ही कधी भाजपकडे गेलो नाही तर भाजपच आमच्याकडे येतो.
भाऊसाहेब, ताईमुळे गोव्याचा विकास
काही अल्पसंख्याक माणसांनाही मगो पक्ष हवा आहे. भाजपने गोवा विकला आहे. दक्षिण गोव्यात आता पाणी मिळते, भाऊसाहेबांनी धरण बांधले म्हणून ते शक्य झाले. राज्यातील विकास कुणीही अडवू शकत नाही. हणजूण धरण ताईने बांधले. 50 वर्षापूर्वी घेतलेले हे दोन महत्त्वाचे निर्णय यावर शेतकरी व सर्वसामान्य माणूस अवलंबून आहे. एमआरएफ, जुवारी पॅक्टरी आम्ही आणली, गोवा डेअरी भाऊसाहेबांनी केली. आम्ही हे सर्व कालांतराने विसरतो. भाऊसाहेब आम्हाला बुजुर्ग माणूस मिळाले असे ढवळीकर म्हणाले.
ओर्ला येथे जी भिंत कोसळली आहे त्याला पूर्णतः अभियंता जबाबदार आहे. मोठय़ा प्रमाणात घोटाळा झाला आहे. ज्याला पाईल्स फाऊंडेशन पाहिजे होते ते त्याला देण्यात आलेले नाही. आपण त्यांना विचारतो तेथे जमीन तपासणी केली आहे काय? कोण तरी येतात आणि असे काम करा असे सांगतात तेव्हा त्याला अभियंता जबाबदार आहे. त्यांच्यावर कारवाई व्हायलाच पाहिजे. यात कंत्राटदाराचा दोष नाही, असे ढवळीकर यांनी सांगितले.
आपण आम आदमी पक्षाबाबत काही बोलत नाही. त्यांचे आमदार नाही. एकच जिल्हा पंचायत सदस्य निवडून आले आहेत. पॅप्टर मिरीयांडो फर्नांडिस चांगले काम करीत आहे. आपणास त्यांचा गर्व आहे, असे ढवळीकर यांनी सांगितले. माजी पंच रामा साटेलकर यांनी सर्वांचे आभार मानले.
बाबू आजगावकरांना ना घर… ना दार! पेडणे मतदारसंघात बाबू आजगांवकर सध्या प्रवीण आर्लेकर यांच्यावर आरोप करीत आहेत, यावर आपले मत काय आहे असे ढवळीकर यांना विचारले असता बाबूंना सध्या घर नाही दार नाही. त्यांना त्यांचा पक्ष तिकिट देणार की नाही हे प्रथम विचारा. प्रवीण आमचा एकखांबी पेडणे मतदारसंघात उमेदवार आहे तसेच जीत आमोणकर व महेश साटेलकर काम करीत आहेत.