भाजपशी युतीचा विचार : नितीन गडकरींना भेटणार पण राजकीय हेतू नाही-सुदिन ढवळीकर
वार्ताहर /मडकई
मगो पक्षाचे 12 मतदारसंघात जोमाने काम सुरू आहे. कार्यकर्त्यांमध्येही उत्साहाचे वातावरण आहे. भाजपा 12 जागा सोडण्यास तयार असल्यास युतीचा विचार करता येईल, असे मगोचे ज्येष्ठ नेते आमदार सुदिन ढवळीकर यांनी स्पष्ट केले आहे. ढवळी येथे एका कार्यक्रमात पत्रकारांशी ते बोलत होते. केंद्रीय मंत्री व भाजपाचे वरिष्ठ नेते नितीन गडकरी हे आज सोमवारी गोव्यात येत असल्याने ढवळीकर यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
नितीन गडकरी हे दूरदृष्टी असलेले आदर्श नेते आहेत. आपण बांधकाममंत्री असताना त्यांच्या सहकार्यामुळे गोव्यात विकासाचे अनेक मोठे प्रकल्प राबविले. राष्ट्रीय महामार्गाच्या उभारणीसाठी गडकरी यांनी 12 हजार कोटींचा निधी उपलब्ध करुन दिला. त्यामुळे त्यांच्याप्रती आपल्या मनात सद्भावना आहे. आपण त्यांची भेट घेणार आहे. मात्र ही भेट राजकीय हेतूने नसेल, असे ढवळीकर म्हणाले. गोव्याच्या विकासामध्ये मगो पक्षाचे महत्त्वपूर्ण योगदान राहिले आहे. मगोने अनेक राजकीय धक्के सोसले. पक्षाला संपवण्याचे अनेकवेळा प्रयत्न झाले. मगो पक्ष विलीन करण्याचा गैरसमज कुणीही पसरवू नये. मगो पक्षाची कारकीर्द आजवर स्वच्छ राहिली आहे. यापूर्वी भाजपासोबत युती करून युतीच्या धर्माचे पालन मगो पक्षानेच केले. यापुढे मगो पक्ष कुठलीच तडजोड करणार नाही. जे कार्यकर्ते मन लावून काम करतात, त्यांच्यावर अन्याय होऊ देणार नाही, असे सुदिन ढवळीकर यांनी स्पष्ट केले.
योग्य दिशा देण्याची कुवत मगोत
मगो पक्ष गोव्यातील सर्वात जुना प्रादेशिक पक्ष असून या भूमिशी त्याची नाळ जुळली आहे. ज्या इमाने इतबारे पक्षाने गोमंतकीयांची सेवा केली, ती यापुढेही अबाधित राहील. गोव्याचे राजकारण गढूळ करण्यासाठी काही नवीन पक्ष गोव्यात दाखल झाले आहेत. गोव्याला योग्य दिशा देण्याची कुवत व जबाबदारी केवळ मगो पक्षच पेलू शकतो. त्यासाठी पक्षाचा विस्तार होण्याची गरज आहे. पक्षाने ज्या 12 मतदारसंघात यापूर्वीच उमेदवार जाहीर केले आहेत, त्यात बदल होणे शक्य नाही. भाजपा किंवा अन्य कुठल्याही पक्षाला मगोशी युती करायची असल्यास त्यांनी या 12 जागा सोडाव्या लागतील. फोंडय़ात केतन भाटीकर, प्रियोळात दीपक ढवळीकर, सावर्डेत बालाजी गांवस, मांद्रेत जीत आरोलकर, पेडणेत प्रवीण आर्लेकर, कुडचडेत आनंद प्रभूदेसाई, शिरोडय़ात संकेत मुळे, मयेत प्रेमेंद्र शेट, डिचोलीत नरेश सावळ, हळदोणेत महेश साटेलकर व मडकईत सुदिन ढवळीकर हे उमेदवार यापूर्वीच जाहीर झाल्याचे त्यांनी सांगितले.
राजकीय नरकासुरांचा पाडाव करा
गोव्याच्या राजकारणातील नरकासुरांचा पाडाव करण्याची वेळ आलेली आहे. माकडउडय़ा घेऊन गोव्याच्या राजकारणाला कलंकीत करणाऱया नेत्यांना येत्या निवडणुकीत योग्य तो धडा शिकवा, तेव्हाच दिवाळी साजरी केल्याचे सार्थक होईल. पक्षबदलू जेव्हा घरी बसतील, तेव्हाच गोव्याचे राजकारण स्वच्छ होईल, असे ते यावेळी बोलताना म्हणाले.