हर्णैतील मच्छीमार बेजार, सुमारे 50 किलोच्या केटला जेमतेम 800 रूपये!
वार्ताहर / हर्णै
हर्णै बंदरातातील मच्छीमारांच्या जाळ्यामध्ये सध्या ‘फिशमिल’चाच भरणा होत असल्याने मच्छीमार हैराण झाले आहेत. यामुळे ऐन हंगामात पापलेट, सुरमईची पतीक्षा करणार मच्छीमार बेजार झाला आहे. या माशाच्या सुमारे 50 किलोच्या केटला जेमतेम 800 रूपयांची किंमत मिळत असल्याने मच्छीमार आर्थिक संकटात सापडला आहे.
कोरोनामुळे थंडावलेली मासेमारी पुन्हा सुरू झाली आहे. सुरूवातीच्या वादळानंतर सध्या समुद्र शांत झालेला दिसत आहे. त्यामुळे हर्णै बंदरातील सर्वच नौकांनी मासेमारीला सुरूवात केली आहे. या मच्छीमारांना एकीकडे परप्रांतीय फास्टर नौकांच्या संकटांना तोंड द्यावे लागत असताना आता त्यांच्या जाळ्यात मोठ्या पमाणात सापडणारा ‘फिशमिल’ त्यांच्यासाठी डोकेदुखी ठरत आहे.
जाळ्यात पापलेट, सुरमईसारख्या दर्जेदार आणि किंमती मासळी येण्याची मच्छीमार वाट पहात असताना त्यांच्या जाळ्यात मात्र फक्त अगदीच कमी किंमत येणारा फिशमिल फसत आहे. यामुळे या दोन्ही संकटांचा सामना कसा करायचा, या विवंचनेत मच्छीमार आहे. फिशमिलच्या 40 ते 50 किलोच्या केटला जेमतेम 800 रुपये दर मिळत आहे. त्यामुळे खर्च जास्त आणि उत्पन्न अल्प अशा परिस्थितीत व्यवसाय करायचा, कसा असा प्रश्न येथील मच्छीमारांसमोर पडला आहे. त्यातच फास्टर बोटींनी समुद्रात धुमाकूळ घातला असून सुमारे हजार ते पंधराशे फास्टर नौका या हद्दीत दिवस-रात्र मासेमारी करत असल्याचे येथील मच्छीमारांचे म्हणणे आहे. शासनाने किमान या फास्टर नौकांचा तरी प्रतिबंध करावा आणि यासाठी मत्स्य सहतटरक्षक दलानेही महत्वाची भूमिका बजावावी, अशी मागणी मच्छीमार बांधवांकडून होत आहे.