प्रतिनिधी/ सातारा
सातारा पालिकेकडे शनिवार पेठेतल्या मच्छी मार्केटबाबत अनेकांनी तक्रारी केल्या होत्या. ओढय़ाला संरक्षक भिंत नाही. भिंत नसल्याने ओढय़ात सरळ मासे ठेवण्याकरता असलेले बॉक्स टाकून दिलेले आहेत. तसेच मांसाचे तुकडेही टाकले गेले असल्याने ओढय़ात कुत्र्यांचा सुळसुळाट वाढला आहे. त्याच तक्रारीवरुन नगराध्यक्षा माधवी कदम यांच्यासह पदाधिकाऱयांनी मच्छी मार्केट आणि मटन मार्केटला सकाळी भेट दिली. विक्रेत्यांना सक्त ताकिद देत अशा पद्धतीने ओढय़ात कचरा टाकल्यास दंडात्मक कारवाईला समोरे जावे लागेल. मटन मार्केटच्या समस्येबाबतही सोमवारी दुपारी 4 वाजता पालिकेच्या सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.
शनिवार पेठेतल्या फिश मार्केटमध्ये दररोज तयार होणारा कचरा ओढयात टाकला जात आहे. तसेच माशे ठेवण्यासाठी असलेले थर्माकॉलचे बॉक्सही तसेच ओढय़ात टाकून दिले जात आहेत. मटन मार्केटमध्येही अनेक गाळें पडून आहेत. अस्वच्छता आहे. गाळय़ात वेगळेच व्यवसाय सुरु असतात. आदी तक्रारीं पालिकेकडे आल्याने नगराध्यक्षा माधवी कदम, उपनगराध्यक्ष किशोर शिंदे, पाणी पुरवठा सभापती यशोधन नारकर, आरोग्य सभापती अनिता घोरपडे, बांधकाम सभापती मिलिंद काकडे, अभियंता भाऊसाहेब पाटील, अभियंता सुधीर चव्हाण, अनंत प्रभुणे, शहर विकासचे श्रीकांत गोडसे, शिर्के, अतिक्रमणचे प्रशांत निकम, आरोग्यचे यादव, गणेश टोपे यांच्यासह मान्यवरांनी मच्छी मार्केटला भेट दिली. भेटीदरम्यान, मच्छी मार्केटमध्ये जे व्यवसायिक आहेत. त्यांना सक्त ताकिद दिली गेली. ओढय़ात थर्माकोलचे बॉक्स टाकत जावू नका, अन्यथा दंडात्मक कारवाई करण्यात येईल. आपल्या परिसराची स्वच्छता राखत जा. पुढे नगराध्यक्षा माधवी कदम आणि उपनगराध्यक्ष किशोर शिंदे यांनी सरंक्षक भिंतीच्या बांधकामाबाबत सुचना बांधकाम विभागाला दिल्या. पुढे मटन मार्केटमध्ये पाहणी करताना गाळेधारकांनी आपले गाऱहाणे मांडले. गाळे जास्त उंचीचे आहेत. त्याची उंची कमी करावी, स्वच्छता राखावी, आदी सुचना मांडल्या. त्यावर अभियंता प्रभुणे यांनी माहिती देताना म्हणाले, येथे 19 गाळे दिले गेले आहेत. त्यापैकी सध्या चारच गाळे सुरु आहेत.जे सध्या दोन गाळे बंद अवस्थेत दिसतात ते गाळे नसून शौचालय आहे, असे सांगितले. उपनगराध्यक्ष किशोर शिंदे यांनी सोमवारी दुपारी 4 वाजता सर्व गाळे धारकांची बैठका बोलवा, त्यामध्ये चर्चा करुन कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन दिले.
सोबत पालिकेचे अधिकारीही
नगराध्यक्षा माधवी कदम, उपनगराध्यक्ष किशोर शिंदे यांच्यासह पदाधिकारी जेथे तक्रारीं आल्या आहेत. तेथे पाहणी करण्यासाठी जाताना पालिकेच्या विभागप्रमुखांचा लवाजमा घेवून जातात. लगेच ऑन दी स्पॉट सुचना देवून फैसला करुन सोडतात. त्यामुळे आजही अधिकाऱयाचे पथक सोबतच घेतले होते.