लाच घेतल्याप्रकरणी न्यायालयाचा दणका
प्रतिनिधी / बेळगाव
घराचा संगणक उतारा देण्यासाठी लाच घेतल्याच्या आरोपावरून मच्छे ग्राम पंचायतीच्या माजी अध्यक्षा व तिच्या पतीला न्यायालयाने शिक्षा ठोठावली आहे. चतुर्थ अतिरिक्त जिल्हासत्र व विशेष न्यायाधीश एन. व्ही. विजय यांनी या दाम्पत्याला शिक्षा ठोठावली आहे.
माजी अध्यक्षा पद्मश्री महावीर हुडेद यांना कलम 7 अन्वये 3 वर्षे सश्रम कारावास, 5 हजार रुपये दंड, दंड न भरल्यास दोन महिने साधी कैद, कलम 13(1),(डी) सहकलम 13(2) लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यांतर्गत 4 वर्षे सश्रम कारावास व 10 हजार रुपये दंड, दंड न भरल्यास 3 महिने साधी कैद अशी शिक्षा ठोठावली आहे.
माजी अध्यक्षाचा पती महावीर सावंत हुडेद हाही दोषी ठरला असून त्याला कलम 8 अन्वये 3 वर्षे सश्रम कारावास, 5 हजार रुपये दंड,
दंड न भरल्यास दोन महिने साधी कैद अशी शिक्षा ठोठावली आहे. तर कलम 12 अन्वये 3 वर्षे सश्रम कारावास, 10 हजार रुपयांचा दंड, दंड न भरल्यास 3 महिने साधी कैद, अशी शिक्षा ठोठावण्यात आली आहे.
मच्छे ग्रामपंचायत अध्यक्षा व पतीच्या कारभाराला परिसरातील नागरिक कंटाळले होते. 28 जानेवारी 2017 रोजी शिवाजीनगर, मच्छे येथील कस्तुरी प्रकाश कोलकार यांच्याकडून घराचा संगणक उतारा देण्यासाठी 3 हजार रुपये मागून यापैकी 500 रुपयांची लाच घेण्यात आली होती. उर्वरित अडीच हजार रुपये पती महावीर मार्फत स्वीकारताना एसीबीच्या अधिकाऱयांनी रंगेहाथ पकडले होते.
एसीबीचे पोलीस निरीक्षक विश्वनाथ कब्बुरी, बी. सी. गौडर आदींनी या प्रकरणाचा तपास करून न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. सरकारतर्फे प्रवीण अगसगी यांनी काम पाहिले. पोलीस अधीक्षक बी. एस. नेमगौडा यांच्या मार्गदर्शनाखाली एसीबीचे पोलीस उपअधीक्षक जे. एम. करुणाकर शेट्टी, एच. सुनीलकुमार, बी. बी. हुद्दार आदींनीही या तपासात भाग घेतला होता.
सामाजिक कार्यकर्त्यांमुळे प्रकरण उघडकीस
मच्छे ग्रामपंचायतीच्या अध्यक्षा पद्मश्री हुडेद व पती महावीर हुडेद यांच्या भ्रष्ट कारभाराला परिसरातील नागरिक कंटाळले होते. सामाजिक कार्यकर्ते व भ्रष्टाचार निर्मूलन परिवाराचे अध्यक्ष सुजीत मुळगुंद, अभिनेते संतोष झावरे, संतोष कांबळे, कल्लाप्पा रामचण्णावर आदींनीही ग्रामपंचायतमधील भ्रष्टाचाराबद्दल आवाज उठविला होता. या कार्यकर्त्यांमुळे भ्रष्ट कारभार उघडकीस आला होता.