वार्ताहर /किणये
40 मायक्रॉनपेक्षा कमी आकाराचे प्लास्टिक वापरू नये, असे आदेश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. अशा प्लास्टिक वापरावर बंदी घालण्यात आलेली आहे. असे असतानाही मच्छे भागात काही व्यापारी 40 मायक्रॉनपेक्षा कमी आकाराचे प्लास्टिक वापरत असल्याची माहिती मच्छे नगरपंचायतीला कळाली. त्यानंतर नगरपंचायतीने थेट कारवाई करून सुमारे 60 ते 70 किलो प्लास्टिक जप्त केले आहे.
मच्छे औद्योगिक वसाहत, बेळगाव-पणजी महामार्ग व विविध प्रकारची कार्यालये यामुळे अलिकडे मच्छे गावचा विस्तार वाढू लागला आहे. बाहेरगावावरून कामानिमित्त येणारा कामगार वर्गही या ठिकाणी स्थायिक होऊ लागला आहे. गावचा विस्तार वाढल्याने मच्छे गावात व महामार्गाजवळ अनेक प्रकारची दुकाने आहेत. काही व्यापारी 40 मायक्रॉनपेक्षा कमी आकाराचे प्लास्टिक वापरत असल्याची माहिती नगर पंचायतीला कळाली. त्यानंतर नोडल अधिकारी शिवानंद व त्यांच्या कर्मचाऱयांनी थेट दुकानांवर धाड टाकून 40 पेक्षा कमी आकाराचे प्लास्टिक जप्त केले आहे. व सदर व्यापाऱयांना तंबी देण्यात आली आहे. यापुढे जर असे प्रकार घडल्यास थेट कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.