वार्ताहर/ किणये
मच्छे – पिरनवाडी ग्रामपंचायतांना नगरपंचायतीचा दर्जा देण्यात येणार आहे. शुक्रवारी झालेल्या राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत याबाबत सविस्तर चर्चा करून अनुमती देण्यात आली आहे. मुख्यमंत्री बी. एस. येडीयुराप्पा व ग्रामविकास मंत्री यांनी या दोन्ही ग्रामपंचायतींना नगरपंचायत करण्याबद्दलचे आदेश दिले आहेत.
गेल्या सात-आठ महिन्यांपासून मच्छे व पिरनवाडी ग्राम पंचायतींना नगरपंचायतीचा दर्जा देण्यासाठी प्रशासनाकडून जोरदार हालचाली सुरू झाल्या होत्या. ग्राम पंचायत निवडणुकाही तोंडावर आल्या असल्याने या ग्रामपंचायती नगरपंचायतमध्ये सामील होणार का? याबाबत इच्छुक उमेदवार व नागरिकांमध्ये चर्चा सुरू होती. अखेर तालुक्यातील या दोन्ही मोठय़ा ग्रामपंचायती नगरपंचायतीमध्ये सामील होण्यासाठी राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत हिरवा कंदील दाखविण्यात आला आहे.
दोन्ही ग्रामपंचायतींचा कारभार पाहून याबद्दलचा अहवाल पाठविण्याचा आदेश यापूर्वीच बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयातून देण्यात आला होता.
कर्नाटक नगरपालिका कायदा 1964 अंतर्गत सरकारकडून पत्रकाद्वारे ही मागणी करण्यात आली होती. मच्छे व पिरनवाडी ग्रामपंचायतांच्या पीडीओंना अहवाल सादर करण्यासंदर्भात पत्रक पाठविले होते.
पिरनवाडी – मच्छे दोन्ही ग्राम पंचायतांमधील मागील तीन वर्षाचे एकूण उत्पन्न आणि खर्च याची ऑडीट प्रत, दोन्ही गावचे नकाशे व चकबंदी तसेच लोकसंख्या आणि 50 टक्क्याहून अधिक कृषी क्षेत्र वगळून नागरिक अन्य कोणते व्यवसाय करतात याबद्दल सविस्तर माहिती या दोन्ही ग्राम पंचायतींनी पाठविली होती.
मच्छे ग्राम पंचायत ही तालुक्यातील 47 सदस्य असणारी सर्वात मोठी ग्राम पंचायत आहे. तसेच पिरनवाडी ग्राम पंचायतीची सदस्य संख्या 45 आहे. यामुळे या दोन्ही ग्रामपंचायतीचे कार्यक्षेत्र मोठे आहे. दोन्ही ग्रामपंचायतींना नगरपंचायतीचा दर्जा मिळाल्यास मच्छे व पिरनवाडी ग्रामपंचायतांचा नक्कीच विकास होवू शकतो, अशी माहिती मच्छे ग्रामपंचायतीचे माजी सदस्य संतोष जैनोजी, माजी अध्यक्ष महादेव मंगणाकर, माजी उपाध्यक्ष असद हुजदार, माजी सदस्य गणपत जाधव, सचिन बेळगावकर, मिना लोहार, कस्तुरी कोलकार आदींसह पिरनवाडी ग्राम पंचायतीचे माजी अध्यक्ष राकेश तळवार, माजी सदस्य प्रमोद मुचंडीकर, यल्लाप्पा पाटील आदींनी दिली आहे.