वार्ताहर /किणये
नेहरुनगर, मच्छे येथे चोरटय़ांनी घर फोडून सोने, चांदी व इतर साहित्य लांबविले आहे. सदर चोरीचा प्रकार शनिवारी रात्री घडला असून ही चोरी रविवारी सकाळी उघडकीस आली. या चोरीमुळे मच्छे भागात खळबळ उडाली आहे.
नेहरुनगर, मच्छे येथील सरस्वती यशवंत पेटकर यांच्या घरी ही चोरी झाली आहे. सरस्वती पेटकर या शनिवारी कंग्राळी येथे आपल्या मुलीच्या घरी गेल्या होत्या. घरात कोणी नसल्याचा व अंधाराचा फायदा घेत चोरटय़ांनी त्यांच्या मच्छेतील घरात चोरी केली आहे.
तेलडबाही पळविला
घराच्या समोरील दरवाजाचे कुलूप व कुंडी तोडून चोरटय़ांनी घरात प्रवेश केला व चांदीचे दोन ब्रेसलेट, सोन्याची 5 ग्रॅमची चेन, 40 हजार रुपये रक्कम, टीव्ही, फोन आदी साहित्यासह स्वयंपाक घरातील पंधरा किलोचा तेलडबाही लांबविल्याची माहिती पेटकर यांनी दिली.
ग्रामपंचायत माजी सदस्य गणपत जाधव यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर वडगाव ग्रामीण पोलिसांनी पंचनामा केला. गेल्या आठवडय़ात मच्छे शिवारातील सहा पंपसेटची चोरी झाली होती. आठवडाभरात पुन्हा चोरी झाल्यामुळे नागरिक भयभीत झाले आहेत.