वार्ताहर / किणये
स्वामीनगर मच्छे येथील श्वेतार्क गणेश मंदिराचा लोकार्पण सोहळा भक्तिमय व उत्साही वातावरणात झाला. गेल्या चार दिवसापासून सुरू असलेल्या या सोहळय़ाची बुधवारी सांगता झाली. परिसरातील भक्तांनी श्वेतार्क गणेशाचे दर्शन घेण्यासाठी मंदिरात गर्दी केली होती. या मंदिरामुळे मच्छे गावात चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे.
गेल्या तीन वर्षापूर्वी स्वामीनगर मच्छे येथे श्वेतार्क गणेश मंदिर बांधण्याचा संकल्प येथील नागरिकांनी केला होता. दानशूर व्यक्ती व मच्छे गावातील नागरिकांच्या एकजुटीमुळे हे मंदिर उभारण्यात आले. श्वेतार्क गणेशमूर्तीही तेलंगणा राज्यातील वारंगल येथे मंदारवृक्षाच्या मुळापासून बनलेली आहे. त्याची हुबेहुब मूर्ती पाषाण स्वरुपात स्वामीनगर मच्छे येथे श्वेतार्क मंदिरात गणेशाची प्रतिस्थापना केली आहे. त्यामुळे मंदिराला विशेष महत्त्व आले असून भक्तगण दर्शनासाठी मंदिराकडे जात आहेत.
टाळ मृदुंगाच्या गजरात मिरवणूक
रविवारी सकाळी ब्रह्मलिंग मंदिर येथून गणेशमूर्तीची मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत कलश घेऊन महिला मोठय़ा संख्येने सहभागी झाल्या होत्या. संपूर्ण गावभर ही मिरवणूक काढली. टाळ मृदुंगाचा गजर मिरवणुकीत दिसून आला.
मंदिराच्या लोकार्पण सोहळय़ानिमित्त स्वामीनगर परिसरात भगवे ध्वज व भगव्या पताका लावण्यात आल्या आहेत. तसेच उद्घाटन सोहळय़ानिमित्त अनेकांनी भगवे फेटे परिधान केले होते. यामुळे मच्छे परिसर भगवेमय बनला होता. सोमवारी रक्षोधन हावन व जलाधिवास करण्यात आला.
मंदिराला विद्युत रोषणाई
मंगळवारी मुख्य संकल्प व नवग्रह हावन करण्यात आले. मंगळवारी रात्रीपासूनच बुधवारच्या मुख्य सोहळय़ाची तयारी सुरू होती. संपूर्ण मंदिराला विद्युत रोषणाई केली होती. तसेच मंदिर फुलहारांनी सजविले होते.
बुधवारी सकाळी देवता पूजन करून श्री गणेशमूर्तीची प्रति÷ापना करण्यात आली. त्यानंतर गणपती बाप्पा मोरयाच्या गजरात कळसारोहण करण्यात आले. मंदिराचे सर्व धार्मिक कार्यक्रम श्रीक्षेत्र हंडिभडंगनाथ मठाचे मठाधीश मोहन नाथजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली झाले. उद्घाटनाला विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित होती.
अनिल पाटील, राजाराम पाटील, सुरेश कदम-पाटील, जितेंद्र पाटील, प्रल्हाद देसाई, विनायक पाटील, मल्लाप्पा देसाई, अरुण सुतार, शिवमूर्ती पाटील, मारुती बिर्जे, अशोक हुडेद, बसवराज मुन्नोळी, केंपण्णा करोळी, विठ्ठल बेळगावकर, विठ्ठल पाटील उपस्थित होते. परिसरातील भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.