तरुणाला कोरोनाची लागण झाल्याने भीतीचे वातावरण
वार्ताहर/ किणये
ज्ञानेश्वरनगर, मजगाव येथील 29 वर्षीय तरुणाला कोरोनाची लागण झाली असल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून शनिवारी महानगरपालिकेच्यावतीने ज्ञानेश्वर नगर मजगाव परिसर सीलडाऊन करण्यात आला आहे.
सदर तरुणाला कॅम्प पोलिसांनी अटक केली होती. त्या तरुणाला कोरोनाची लागण झाली असल्याने त्याला अटक करणाऱया पोलीस निरीक्षकासह 11 जणांना संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे. सदर तरुण हा मजगाव येथील ज्ञानेश्वरनगरात राहतो. त्यामुळे या परिसरात कडक संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
मजगावात कोरोनाचा रुग्ण आढळून आल्याने परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत. त्या तरुणाच्या कुटुंबातील सदस्यांनाही क्वारंटाईन करण्यात आले आहे. महानगरपालिकेच्यावतीने शनिवारी मजगावमधील कलमेश्वरनगर क्रॉस व ज्ञानेश्वरनगरात ठिकठिकाणी बॅरिकेड्स लावून रस्ते बंद करण्यात आले आहेत. तसेच घरातून कोणीही बाहेर पडू नये. व प्रशासनाच्या नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे. ज्ञानेश्वरनगरातील लोकांनी मास्क व सॅनिटायझरचा वापर करावा. सामाजिक अंतर ठेवावे, एकमेकांच्या घरात कोणीही जाऊ नये, असेही सांगून परिसरात जनजागृती करण्यात आली.