प्रतिनिधी/ बेळगाव
महावीरनगर, मजगाव येथील एका बंद घराचा कडीकोयंडा तोडून चोरटय़ांनी सुमारे 2 लाखांचे दागिने पळविले आहेत. सोमवारी चोरीचा हा प्रकार उघडकीस आला आहे.
यासंबंधी राजू शरद लट्टे यांनी उद्यमबाग पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे. दि. 14 मे च्या सायंकाळी 6 ते सोमवार दि. 16 मे च्या दुपारी 12 यावेळेत चोरीचा हा प्रकार घडला आहे. घटनेची माहिती समजताच उद्यमबाग पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.
आपल्या घराला कुलूप लावून राजू व त्यांचे कुटुंबीय गावी गेले होते. चोरटय़ांनी बंद घराचा कडीकोयंडा तोडून नेक्लेस, अंगठी, कर्णफुले असे सुमारे 43 ग्रॅमहून अधिक सोने, 60 ग्रॅम चांदी आदी साहित्य लांबविले आहे. उद्यमबाग पोलीस पुढील तपास करीत आहेत.