सुमारे तीन लाख रुपयांचा शेतकऱयांना गंडा : शेतकऱयांत भीतीचे वातावरण
प्रतिनिधी /बेळगाव
मजगाव येथील शेतवडीतील सात शेतकऱयांच्या पंपसेटच्या मोटारींची अज्ञात चोरटय़ांनी शनिवारी रात्री चोरी करून सुमारे तीन लाख रुपयांचा शेतकऱयांना गंडा घातला आहे.
शनिवारी दुपारी वादळी वाऱयासह पावसाच्या जोरदार सरी कोसळल्याने शेतकरी वर्ग शेताकडे शनिवारी रात्री फिरकला नाही. अज्ञात चोरटय़ांनी याचा लाभ घेत सात शेतकऱयांच्या पंपसेटच्या मोटारींची पाईप व इलेक्ट्रिक कनेक्शन कापून पंपसेट पळविले
आहेत.
माजी नगरसेवक नागाप्पा देवाप्पा सातेरी, नारायण सोमाण्णा सातेरी, मारुती शाबाण्णा सातेरी, शितल तवनाप्पा बस्तवाड, बाबू यल्लाप्पा बस्तवाड, धर्नेंदर सावंत हणबरट्टी, तवनाप्पा श्रीपाल देसाई व पद्मनाभ तमाण्णा पाटील यांच्या विहिरीतील पंपसेट काढता न आल्याने चोरटय़ांनी त्या पंपसेटची विजेची वायर कापून टाकून सर्व दोऱया विहिरीत कापून टाकल्याचे निदर्शनास आले.
सदर घटना रविवारी सकाळी शेतकरी शेताकडे गेल्यावर निदर्शनास आल्याने एकच खळबळ उडाली. प्रत्येकजण आपापले पंपसेट पाहणी केल्यानंतर सदर प्रकार उघडकीस आला. परिणामी भीतीचे वातावरण शेतकऱयांत पसरले.
गेल्या आठवडय़ातच मच्छे येथेही शेतकऱयांच्या पंपसेटची चोरी झाली होती. त्याच अज्ञात टोळक्याचे हे काम असावे, अशी चर्चा सर्वत्र सुरू होती.
सदर घटनेची माहिती उद्यमबाग पोलिसांना देण्यात आली. यावेळी उद्यमबाग पोलीस स्थानकाचे सीपीआय धीरज शिंदे यांनी पंचनामा करून पुढील तपास करीत असल्याचे समजते.