११ जणांना अटक, तीन दिवस पोलीस कोठडी, रोख ४१ हजारांसह ३ लाखांचा मुद्देमाल जप्त
प्रतिनिधी / कोल्हापूर
मटका किंग विजय पाटील याच्या कांडगांव (ता. करवीर) येथील मटका अड्यावर स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पोलिसांनी सोमवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास छापा टाकला. यामध्ये विजय पाटीलसह ११ जणांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून ४१ हजार रुपये रोख, देशी विदेशी दारु, ११ मोबाईल हँडसेट, ४ दुचाकी, १ जिप्सी गाडी असा सुमारे ३ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून याबाबतची फिर्याद पोलीस नाईक सागर भिमराव कांडगावे यांनी दिली.
विजय लहु पाटील (वय 50), पांडुरंग दत्तात्रय चव्हाण (वय 62 दोघेही रा. कांडगाव ता. करवीर), दत्तात्रय बापू पाटील (वय 45 रा. देवाळे ता. करवीर), विजय बळवंत पाटील (वय 35), अनिल नंदकुमार लोखंडे वय 19) , शहाजी बाळासाहेब पाटील (वय 46 सर्व रा. देवाळे ता. करवीर), उदय हिंदूराव चव्हाण (वय 42), सागर मारुती घोटणे (वय 39), अमित आनंदराव लोखंडे (वय 28), अमित अतुल भट (वय 35 सर्व रा. कांडगाव ता. करवीर), युवराज बाळू पाटील (वय 42 रा. वाशी ता. करवीर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. सर्व संशयीतांना मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांना न्यायालयाने 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
याबाबत अधिक माहिती अशी की, कांडगांव (ता. करवीर) येथे विजय पाटील याच्या उत्सव हॉटेलच्या पिछाडीस पत्र्याच्या बंदिस्त खोलीत जुगार अड्डा सुरु असल्याची माहिती पोलीस अधिक्षक शैलेश बलकवडे यांना मिळाली. त्यांनी कारवाई करण्याच्या सुचना स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांना दिले. यानुसार सोमवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास सहाय्यक पोलिस निरीक्षक सत्यराज घुले, उपनिरीक्षक विनायक सपाटे, अंमलदार तुकाराम राजीगरे, सुनील कवळेकर, अमोल कोळेकर, अजित वाडेकर, पांडूरंग पाटील, नितीन चोथे, संदीप कुंभार, सागर कांडगावे, यांनी कांडगांव येथील हॉटेलवर छापा टाकला. हॉटेलच्या पिछाडीस एका कोपऱयामध्ये पत्र्याच्या शेडमध्ये विजय पाटीलसह सर्व संशयीत विना मास्क मुंबई मटका जुगाराचे ऑफिस चालवित असल्याचे दिसून आला. तसेच अमित भट हा एका खोलत विनापरवाना बेकायदेशीर देशी विदेशी दारुची विक्री करत असल्याचे समोर आले. पोलीसांनी या अड्यावरुन 41 हजार रुपये रोख, देशी विदेशी दारु, ११ मोबाईल हँडसेट, ४ दुचाकी, १ जिप्सी गाडी असा सुमारे ३ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
दरम्यान सर्व संशयीतांवर महाराष्ट्र जुगार कायदा कलम 4 व 5, महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम 65(ई), सह राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 51 (ब), महाराष्ट्र कोवीड उपाययोजना 2020 चे कलम 11 सह साथीचा रोग रोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 मधील खंड 2,3,4 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.