प्रतिनिधी / सातारा :
अवैधरित्या सातारा शहर व शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सूरू असलेला मटका व्यवसाय हा पोलिसांच्या पोकळ कारवाईनंतर ही सुरू असतो. यामुळे ठोस कारवाईची गरज असताना फक्त जुगाराच्या अड्डय़ांवर छापा टाकला जातो. यामुळे खुलेआम मटका सुरू असतानाही त्याकडे होणारे दुर्लक्ष या मटका व्यवसायिकांना प्रोत्साहन देत आहे.
सातारा शहर व शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत तेजीत सुरू असलेल्या मटका व्यवसायिकांवर पोलिसांचा वचक राहिला नसल्याचे दिसत आहे. विविध भागात कारवाईचा रोजच धडका सुरू असताना हे मटका व्यवसायिक रोज ठिकाणे बदलून व्यवसाय सुरू ठेवत आहेत. या बदलत्या ठिकाणाची माहिती पोलिसांना मिळेपर्यंत आकडय़ाचा खेळ सुरू राहत आहे. यामुळे अनेक भागात असुरक्षितेचे वातावरण निर्माण झाले आहे. गृहराज्यमंत्री(ग्रामीण) शंभुराज देसाई यांनी मुली-महिलांच्या सुरक्षितेसाठी पथदर्शी प्रकल्प सुरू केला आहे. एकीकडे सुरक्षितता वाढावी म्हणून प्रयत्न होत आहे. तर मटक्या व्यवसायामुळे मुली-महिलांना जीव मुठीत घेवून प्रवास करावा लागत आहे.
अनेक भागात छापा टाकून फक्त जुगाराच्या कारवाईची आकडेवारी पोलीस पुढे करतात. मटक्याच्या अड्डय़ांवर होणारी कारवाईची स्वतंत्र आकडेवारी पोलिसांकडे उपलब्ध नसते की काय ? असा प्रश्न होत आहे. खुलेआम सुरू असणाऱ्या या व्यवसायाला मिळणारे पाठबळ हे तरूण पिढीसह एका कुटुंबाला उद्धवस्त करण्यास खत-पाणी घालत आहे. यामुळे मटका व्यवसाय बंद होण्याची मागणी नागरिकांकडून वारंवार करण्यात येत असली तरी पोलीस ठोस भूमिका घेत नसल्याचा आरोप नागरिकांकडून वारंवार होत आहे.