पोलीस उपायुक्तांची धडक मोहीम, किंगपिन महम्मदशफीला अटक, 2 लाख रुपये जप्त
प्रतिनिधी / बेळगाव
गेल्या आठवडय़ात पोलीस उपायुक्तपदी रुजू झालेल्या डॉ. विक्रम आमटे यांनी मटका, जुगारी अड्डे चालकांविरुद्ध धडक मोहीम सुरू केली आहे. मंगळवारी रात्री खंजर गल्ली येथील मटका व्यवसायाचा किंगपिन महम्मदशफी तहसीलदारसह 23 जणांना अटक करण्यात आली असून या अड्डय़ावरून 2 लाख 11 हजार 910 रुपये रोकड जप्त करण्यात आली आहे.
अलिकडे मटका व्यवसायिकांविद्ध झालेली ही मोठी कारवाई आहे. सर्व 23 जणांविरुद्ध मार्केट पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस आयुक्त डॉ. के. त्यागराजन यांनी एका पत्रकाद्वारे दिली आहे. या कारवाईने मटका, जुगार व्यावसायिकांत धडकी भरली आहे. कारवाईच्या धास्तीने गैरधंदे चालक परागंदा होवू लागले आहेत.
खंजर गल्ली येथे महम्मदशफी तहसीलदारचा मोठा अड्डा चालतो. यापूर्वी छोटीमोठी कारवाई केल्याचा आव आणला जात होता. पोलीस आयुक्त डॉ. के. त्यागराजन यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त डॉ. विक्रम आमटे, मार्केटचे एसीपी सदाशिव कट्टीमनी, पोलीस निरीक्षक संगमेश शिवयोगी व त्यांच्या सहकाऱयांनी अचानक छापा टाकून 23 जणांना अटक केली.
या अड्डय़ावरुन 2 लाख 11 हजार 910 रुपये रोख रक्कम, मटक्मयाच्या चिठ्ठय़ा, 15 मोबाईल संच जप्त करण्यात आले आहेत. बुधवारी पोलीस आयुक्तांनी एका पत्रकाव्दारे ही माहिती दिली आहे. मटका, जुगार व अमलीपदार्थांविरुध्द कारवाई तीव्र करण्यात आली आहे. या गैरधंद्यांविषयी नागरिकांनी पोलिसांना माहिती द्यावी. जेणेकरुन हे गैरधंदे थोपविण्यासाठी मदत होईल, असे आवाहन पोलीस आयुक्तांनी केले आहे.
यापूर्वी पोलीस आयुक्त दर्जाच्या काही अधिकाऱयांनी मटकाबुकी व जुगारी अड्डे चालकांबरोबर थेट संधान बांधून भाऊबंदकीचे नाते जोडले होते. त्यामुळे कनिष्ट अधिकाऱयांना हे अड्डे चालक थेट धारेवर धरत होते. आमच्या अड्डय़ावर फिरकलास तर याद राख, तुमचे साहेब आमच्या खिशात आहेत, अशी धमकी देत होते. हा सारा प्रकार लक्षात आल्यामुळेच नव्याने दाखल झालेले पोलीस आयुक्त व उपायुक्तांनी कारवाईचा सपाटा सुरु केला आहे. त्यामुळे मटका व जुगारी अड्डे चालकांचे धाबे दणाणले आहेत.
आणखी दोघांना अटक
दरम्यान खडेबाजार पोलिसांनीही मटका बुकींविरुध्द आघाडी उघडली आहे. बुधवारी पोलीस निरीक्षक धिरज शिंदे व त्यांच्या सहकाऱयांनी काकतीवेस रोडवर फईम कोतवाल, नौशाद मुजावर (दोघेही रा. खंजर गल्ली) या दोघा जणांना अटक करुन त्यांच्या जवळून 2 हजार 900 रुपये रोख रक्कम व मटक्मयाच्या चिठ्ठय़ा जप्त केल्या आहेत.