नोटीस बजावूनही भाडय़ाची रक्कम जमा न केल्याने महसूल विभागाच्यावतीने टाळे ठोकण्याची कारवाई
प्रतिनिधी / बेळगाव
कसाई गल्ली मटण मार्केटमधील गाळे भाडेतत्त्वावर देण्यासाठी लिलाव करण्यात आले होते. पण गाळेधारकांनी केवळ अनामत रक्कम जमा केली असून, भाडे जमा करण्यात आले नाही. त्यामुळे महसूल विभागाने गुरुवारी मटण मार्केट व गोवावेस येथील फिश मार्केटमधील गाळय़ांना टाळे ठोकण्याची कारवाई केली.
महसूल वाढविण्यासाठी महानगरपालिकेने विविध ठिकाणाचे गाळे भाडेतत्त्वावर दिले आहेत. याकरिता लिलाव प्रक्रिया राबविली होती. पण सदर गाळेधारकांनी अनामत रक्कम व 4 महिन्यांचे भाडे महापालिकेकडे जमा करणे आवश्यक आहे. मात्र मटण मार्केटमधील गाळेधारकांनी अनामत रक्कम भरणा केली असून, गाळय़ाचे भाडे जमा केले नाही. ऑक्टोबरमध्ये गाळय़ांचा लिलाव करून गाळेधारकांना ताबा देण्यात आला होता. तसेच गोवावेस येथील दोन गाळय़ांचा लिलाव झाला होता. पण सदर गाळेधारकांनी अद्याप भाडय़ाची रक्कम जमा केली नाही. त्यामुळे भाडय़ाची रक्कम जमा करण्यासाठी महसूल विभागाने गाळेधारकांना नोटीस बजावली होती. पण ही रक्कम जमा केली नसल्याने महसूल विभागाच्यावतीने गाळय़ांना टाळे ठोकण्याची कारवाई गुरुवारी राबविण्यात आली.
मटण मार्केटमधील 5 गाळय़ांना टाळे ठोकण्यासाठी मनपा महसूल विभागाचे पथक दाखल झाले असता व्यावसायिकांनी विरोध केला. गाळय़ाचे भाडे भरण्यासाठी मुदत देण्याची मागणी केली. तसेच टाळे ठोकण्यास आक्षेप घेऊन अधिकाऱयांना घेराव घातला. पण भाडे भरण्यासाठी यापूर्वीदेखील मुदत दिली होती. मात्र भाडे जमा केले नाही. वास्तविक पाहता भाडय़ाची रक्कम जमा केल्यानंतरच गाळय़ांचा ताबा देण्यात येतो. पण मटणमार्केटमधील पूर्वीच्याच गाळेधारकांनी गाळे घेतले असल्याने गाळय़ांचा ताबा पूर्वीपासूनच गाळेधारकांकडे होता. केवळ अनामत रक्कम भरून व्यवसाय सुरू केला होता. त्यामुळे महानगरपालिकेने गुरुवारी टाळे ठोकण्याची कारवाई केली. वारंवार सूचना करूनही भाडे भरत नसल्याने मनपाकडून ही कारवाई करण्यात येत असल्याचे महसूल अधिकारी संतोष अनिशेट्टर यांनी गाळेधारकांना सांगितले. प्रथम नियमानुसार गाळय़ाचे आगाऊ भाडे महानगरपालिकेकडे जमा करावे, अशी सूचना गाळेधारकांना केली. त्यानंतर 5 गाळय़ांना टाळे लावण्यात आले. तसेच गोवावेस येथील नवबागवेस येथील 4 गाळे भाडेतत्त्वावर देण्यासाठी लिलाव आयोजित केला होता. पण यापैकी दोन गाळय़ांना बोली लागली होती. सदर गाळय़ाचे भाडे जमा केले नसल्याने त्या दोन गाळय़ांनाही टाळे ठोकण्यात आले. यावेळी महसूल अधिकारी संतोष अनिशेट्टर, महसूल अधिकारी नंदू बांदिवडेकर व इतर अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.