20 हून अधिक स्वामीजींनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
प्रतिनिधी /बेंगळूर
राज्यात मुख्यमंत्री बदलाची चर्चा सुरू असतानाच राज्यातील विविध मठाधीशांनी मुख्यमंत्री येडियुराप्पा यांना पाठिंबा दर्शविला आहे. येडियुराप्पांना मुख्यमंत्री पदावरून हटविल्यास त्याचे गंभीर परिणाम भाजपला भोगावे लागतील, असा इशाराही स्वामीजींनी भाजप हायकमांडला दिला आहे.
मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी 26 जुलै रोजी भाजपच्या विधीमंडळ नेत्यांची बैठक बोलाविली आहे. येडियुराप्पा यांना मुख्यमंत्रिपदावरून पायउतार करण्यात येणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्याने मंगळवारी लिंगायतसह विविध समुदायातील मठांच्या 20 हून अधिक स्वामीजींनी येडियुराप्पा यांची भेट घेऊन पाठिंबा दर्शविला आहे. त्याचप्रमाणे वीरशैव-लिंगायत समुदायातील अनेक भाजप नेतेही येडियुराप्पांच्या पाठिशी आहेत. याद्वारे त्यांनी नेतृत्त्व बदलाला ठामपणे विरोध केला आहे.
मंगळवारी चित्रदुर्गमधील मुरुघमठाचे डॉ. शिवमूर्ती मुरुघ स्वामीजी, मादार चन्नय्या स्वामीजी, अथणीच्या गच्चीनमठाचे शिवबसव स्वामीजी, इळकलचे गुरुमहांतेश्वर स्वामीजी, शिरसीतील रुद्रदेवर मठाचे मल्लिकार्जुन स्वामीजी, चळकेरी येथील बसवकिरण स्वामीजी, रंभापुरी मठाचे स्वामीजी यांच्यासह अनेक मठाधीशांनी येडियुराप्पा यांची त्यांच्या बेंगळूरमधील ‘कावेरी’ या निवासस्थानी भेट घेऊन चर्चा केली.
आणखी एकीकडे येडियुराप्पा यांच्या समर्थक गटानेही सोमवारी रात्री उशिरा भोजनावळीच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. आर. अशोक, डॉ. के. सुधाकर, बसवराज बोम्माई, व्ही. सोमण्णा, एस. टी. सोमशेखर, भैरती बसवराजू, बी. सी. पाटील यांचा यामध्ये समावेश आहे. मंगळवारी सकाळीही आर. अशोक, बसवराज बोम्माई, व्ही. सोमण्णा, अमृत देसाई, विरुपाक्षप्पा माडाळ आदींनी येडियुराप्पांची भेट घेतली आहे. नवा मुख्यमंत्री हा लिंगायत समाजातीलच असावा, यासाठी येडियुराप्पा प्रयत्नशील असल्याचे समजते.