प्रतिनिधी / मडगाव
मडगावचे उद्योजक राजेश प्रकाश तिंबलो (54) यांचे काल सोमवारी सायंकाळी 7 वा. मुंबईत अल्प आजाराने निधन झाले. राजेश तिंबलो हे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते व मुंबईत त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचारादरम्यानच त्यांचे निधन झाले. गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांचे ते मेहूणे होत.
मडगावचे प्रसिद्ध खनिज उद्योजक प्रकाश तिंबलो यांचे ते चिरंजीव होते. त्यांच्या पश्च्यात वडिल प्रकाश तसेच आई, पत्नी व दोन मुले असा परिवार आहे. उद्योजक राजेश तिंबलो यांच्या निधनाचे वृत्त मडगावात धडकात त्यांच्या मित्र परिवाराला जबरदस्त धक्काच बसला. विरोधी पक्षनेते व मडगावचे आमदार दिगंबर कामत यांनी राजेश तिंबलो यांच्या निधनावर दुःख व्यक्त करताना आपण आपला एक मित्र तसेच युवा उद्योजक गमावल्याचे म्हटले आहे. आपण तिंबलो कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असल्याचे ही त्यांनी म्हटले आहे.