प्रतिनिधी /मडगाव
मडगावच्या ईएसआय हॉस्पिटलमध्ये एका महिला कर्मचारीने धिंगाणा घालण्याचा प्रकार उघडकीस आला असून त्या संदर्भातील व्हिडिओ मोठय़ा प्रमाणात व्हायरल झाले आहेत. या महिला कर्मचारीचे वर्तन सद्या इतर कर्मचाऱयांना बरेच त्रास दायक ठरू लागले आहे. या महिला कर्मचारी सदंर्भात तक्रारी केल्या तरी कोणी दखल घेत नसल्याची माहिती देखील पुढे आली आहे.
सद्या जो व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. त्यात ती महिला कर्मचारी डय़ुटीवर असलेल्या एका नर्सला शिव्या देत असून नंतर तिला ढकलून खाली पाडत असल्याचे स्पष्टपणे दिसून येते. तिने डय़ुटीवरील नर्सला का शिव्या दिल्या हे अद्याप स्पष्ट झाले नसले तरी आपले वेतन हडप केल्याचा आरोप तिच्याकडून होत आहे. ही महिला कर्मचारी सर्व नियम धाब्यावर बसवून अगदी खालच्या पातळीवर जाऊन शिव्या देताना आढळून येते.
उपलब्ध माहिती प्रमाणे, या महिला कर्मचारीचे मानसिक संतुलन ठीक नसल्यानेच ती अशा प्रकारे वागत असल्याचे सांगण्यात येते. या पूर्वी देखील तिने अशाच प्रकारे डय़ुटीवरील नर्सेसना त्रास दिला आहे. तिच्यावर कारवाई करावी अशी मागणी इतर कर्मचारी करीत असले तरी तिच्यावर का कारवाई होत नाही. तिला कुणाचा राजकीय वरदहस्त आहे असा सवाल देखील इतर कर्मचारी उपस्थित करीत आहेत.
सद्या या महिला कर्मचारीचे वर्तन इतर सर्वांना त्रास दायक ठरू लागले आहे. ती बेफाम वागत असून जो पर्यंत तिच्यावर कारवाई होत नाही तो पर्यंत तिचा धिंगाणा संपणार नसल्याच्या प्रतिक्रीया व्यक्त होत आहे. या महिला कर्मचारीचा धिंगाणा रोखण्यासाठी ईएसआय हॉस्पिटलमधील महिला सेक्युरीटी गार्डना धावपळ करावी लागते.