प्रतिनिधी/ मडगाव
मडगावच्या श्री हरिमंदिराचा 111 व्या दिंडी महोत्सव काल कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात आला. असंख्य भाविकांनी सामाजिक अंतर ठेऊन व ‘मास्क’चा वापर करून श्रीचे दर्शन घेतले. यंदा दिंडी महोत्सवातील सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले होते.
काल शनिवारी सकाळी श्री हरिमंदिरात सकाळी 8.00 वा. श्री विठ्ठल रुक्मिणी, श्री सिद्धि गणपती व श्री संकटमोचन हनुमान देवांना पंचामृत अभिषेक आणि विधीवत महापूजा झाली. त्यानंतर 10.00 वा. श्री सत्यनारायण महापूजा. 12.30 वा, महाआरती व सांयकाळी ‘दीपोत्सव’ साजरा करण्यात आला.
सायंकाळी 7.00 वा. दिंडी ऊत्सवाच्या पवित्र ‘ग्रंथ पोथ्या’ व ‘विणा’ घेऊन विठु नामाच्या गजरात मंदिराला पाच प्रदक्षिणा पूर्ण करून प्रतिकात्मकपणे उत्सव साजरा करण्यात आला. रात्री 8.30 वा. महाआरती झाल्या. भाविकांना कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सामाजिक अंतर आणि तोंडावर मास्क बांधून दर्शनाची सोय करण्यात आली. असंख्य भाविकांनी यावेळी आवर्जुन उपस्थिती लावून श्रींचे दर्शन घेतले.