उपमुख्यमंत्री आजगांवकर यांचा आरोप
प्रतिनिधी /मडगाव
मडगाव मतदारसंघाचा विकास साध्य करण्यास मडगावचे आमदार दिगंबर कामत यांना अपयश आल्याची जोरदार टीका उपमुख्यमंत्री मनोहर उर्फ बाबू आजगांवकर यांनी काल मडगावात घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली. मडगाव शहरात अनेक समस्या असून या समस्यांवर श्री. कामत यांनी कधीच आवाज उठविलेला नाही. निवडणुकीत मतदारांना पैसे देऊन ते विजयी होतात असा आरोप ही श्री. आजगांवकर यांनी केला.
मडगाव मतदारसंघात भाजपने आपल्याला उमेदवारी दिलेली आहे. मडगावचे संपूर्ण भाजप मंडळ तसेच इतर कार्यकर्ते आपल्या विजयासाठी कार्यरत झाले असून आपला विजय नक्की असल्याचा दावा उपमुख्यमंत्री श्री. आजगांवकर यांनी केला. आज आपण घरोनघरी प्रचार करीत असून मतदारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याची माहिती त्यांनी दिली. आजवर मडगावची जनता उघडपणे काहीच बोलत नव्हती. मात्र, आत्ता उघडपणे बोलू लागली आहे व त्यातूनच आपल्याला पाठिंबा व्यक्त होत असल्याचा दावा त्यांनी केला.
आपण पेडणे मतदारसंघात अनेक विकासकामे राबविली. अनेक बेरोजगार युवकांना रोजगार प्राप्त करून दिला. आपण या मतदारसंघात जाण्यापूर्वी या मतदारसंघाची परिस्थिती वाईट होती. मात्र, आपण रस्ते, वीज, पाणी या मुलभूत सुविधा बरोबरच पूल, आरोग्य केंद्र, स्टेडियम उभारली. मोपा विमानतळाला सुरवातीला विरोध केला जायचा. मात्र, आपण या प्रकरणात लक्ष घालून लोकांची समजूत काढली. त्यामुळे आज मोपा विमानतळावर रोजगारांच्या संधी उपलब्ध झाल्याची माहिती त्यांनी दिली.
पेडणे मतदारसंघात जर चांगली विकासकामे राबविली होती तर पक्षाने पेडणे मतदारसंघात का उमेदवारी नाकारली असा सवाल उपस्थित केला असता, श्री. आजगांवकर म्हणाले की, पक्षाला मडगाव मतदारसंघ जिंकायचा असल्याने आपल्याला मडगाव मतदारसंघात उमेदवारी देऊ केली व पेडणेत प्रवीण आर्लेकर यांना उमेदवारी दिलेली आहे.
प्रवीणचा ड्रग्स विषय संपला
भाजपचे प्रदेश अध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांच्या सांगण्यावरून उपमुख्यमंत्री मनोहर आजगांवकर हे प्रवीण आर्लेकर हे ड्रग्स व्यवसायात असल्याचा आरोप करीत होते. या संदर्भात त्यांना छेडले असता ते म्हणाले की, प्रवीण आर्लेकर हे आत्ता भाजपमध्ये आले असून ड्रग्सचा विषय संपला आहे. ड्रग्स संदर्भात प्रवीणने पक्षाच्या नेत्यांना स्पष्टीकरण दिले असावे असे ही बाबू आजगांवकर म्हणाले.
मगोच्या नेत्यांची भेट घेण्यासाठी गेलोच नव्हतो
पेडणे मतदारसंघात भाजपने उमेदवारी नाकारल्यानंतर उपमुख्यमंत्री बाबू आजगांवकर हे अस्वस्थ झाले होते. भाजपवर त्यांनी तोफ डागण्यास सुरवात केली होती. भाजपकडून उमेदवार मिळणार नाही हे लक्षात येताच त्यांनी बांदोडय़ात जाऊन मगोचे नेते सुदिन ढवळीकर यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, सुदिनने त्यांना भेटण्याचे टाळले होते. मगोचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी त्यांची भेट घेऊन मगोची उमेदवारी दिली जाणार नसल्याचे स्पष्ट केले होते. या बाबू आजगांवकर यांच्या बरोबर टीएमसीचे नेते चर्चिल आलेमाव उपस्थित होते. या संदर्भात पत्रकारांनी छेडले असता बाबू आजगांवकर म्हणाले की, आपण मगोच्या नेत्यांची भेट घेण्यासाठी गेलोच नव्हतो. आपल्या संदर्भात अफवा पसरविण्यात आल्या होत्या.
या पत्रकार परिषदेला मडगाव भाजप मंडळाचे अध्यक्ष रूपेश महात्मे, सचिव सुनील नाईक, महिला मोर्चाच्या राज्य सरचिटणीस रंजिता पै, भाजपचे प्रवक्ते शर्मद पै रायतूरकर, पराग रायकर व सुबोध गोवेकर उपस्थित होते. यावेळी मडगाव भाजपमध्ये गटबाजी नसल्याने दर्शविण्यासाठी सर्वांनी बाबू आजगांवकर यांच्या सोबत हात वर केले. यावेळी रूपेश महात्मे यांनी आपले विचार मांडताना मडगाव मतदारसंघात भाजपला सर्वत्र चांगला प्रतिसाद मिळत असून मडगावात यावेळी नक्की बदल होणार असल्याचा दावा केला. यावेळी रंजिता पै व शर्मद पै रायतूरकर यांनी ही आपले विचार मांडले. सर्व मतदारांनी भाजपला साथ द्यावी असे आवाहन त्यांनी केले.