प्रसाद नागवेकर/ मडगाव
थोर स्वातंत्र्यसेनानी राम मनोहर लोहिया यांनी मडगावातील लोहिया मैदानावरून केलेल्या भाषणाने गोमंतकीयांच्या मनामध्ये स्वातंत्र्याची ज्योत पेटविली आणि म्हणून नंतर गोवा पोर्तुगीजांच्या जोखडातून मुक्त झ?ाला. असे असताना ज्या ठिकाणी ही ज्योत पेटविण्यात आली त्या लोहिया मैदानाची मात्र पालिका व शासनाकडून योग्य देखरेख ठेवली जात नसल्याने दुरवस्था झालेली असून हे पवित्र स्थान सध्या दारूडय़ांचा अड्डा बनले आहे. येथील लोहिया स्मारकावर चक्क कपडे वाळत घातले जात असून स्मारकाच्या शेजारीच टाकण्यात आलेल्या कचऱयांच्या ढिगांमुळे या स्थानास बकाल स्वरूप प्राप्त झाले आहे. यातून लोहिया यांच्या आत्म्यास ठेच पोहोचेल हे मात्र खरे…
लोहिया मैदानाची मालकी सध्या मडगाव पालिकेडे आहे. त्यामुळे देखरेख ठेवण्याची जबाबदारीही पालिकेची आहे. पालिका इमारतीपासून अवघ्या दोनशे मीटरांत हे मैदन आहे. मात्र मागील काही वर्षांपासून पालिका प्रशासन लोहिया मैदानाची सदर जबाबदारी पेलण्यात कुचकामी ठरल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे बेवारस फिरणारे दारूडे चक्क दारूच्या बाटल्या व ‘चकणा’ घेऊन या मैदानावर बसून पाटर्य़ा करत असतात. दुसरीकडे काहींसाठी दिवसा तसेच रात्री झोपण्यासाठी ही जागा सोयीची बनली आहे. यातच येथे घरोबा करून असलेले काही जण लोहियांच्या स्मारकावर चक्क कपडे वाळत घालत असतात.
सुरक्षा रक्षक गेले कुठे ?
या मैदानाला संरक्षक भिंत नसून कुंपण असले तरी, कोणी सहज त्यावरून आंत प्रवेश करू शकतो. दोन दरवाजांना टाळे होते, मात्र टाळे गायब झाल्याने सर्वांचे आयतेच फावत असून सदर स्मारकाजवळ लोक कचरा आणून टाकत असल्याने येथे कचऱयाचा ढीग तयार झाला आहे. पालिकेचे अधिकारी लोहिया मैदानावर देखरेख ठेवण्यासाठी सुरक्षा रक्षक तैनात केले असल्याचे सांगत असले, तरी प्रत्यक्षात तेथे सुरक्षा रक्षक कधी दिसून येत नाहीत. सुरक्षा रक्षक तैनात केलेले असल्यास दारूडे आंत प्रवेश करण्याचे तसेच अन्य विपरित प्रकार येथे कसे घडतात हा मोठा प्रश्न आहे. पालिका दरबारी मात्र सुरक्षा रक्षकांचे वेतन फेडल्याची नोंद असते. याशिवाय मैदानाच्या जवळच सुलभ शौचालय असून ते बंद असले, तरी त्याच्या बाहेर नैसर्गिक विधी करून जाण्याचे प्रकार राजरोस घडत असतात.
सौंदर्यीकरण मार्गी लावण्यात अपयश
गोवा मुक्तीनंतर सदर मैदानाचा वापर राज्यांतील सर्व राजकीय पक्षांनी आपल्या प्रचारसभा घेण्यासाठी केलेला आहे तसेच गोव्याशी संबंधित प्रत्येक चळवळीची साद याच ऐतिहासिक मैदानावरून घालण्यात आली आहे. अनेक पक्षांचे भवितव्य या लोहिया मैदानावर ठरलेले असले, तरी त्याच्या हितासाठी वा त्याचे सौंदर्यीकरण करण्याबाबत मागील पाच दशकांत कोणीही पावले उचलली असल्याचे दिसून येत नाही. मडगावचे स्थानिक आमदार दिगंबर कामत हे 5 वर्षे मुख्यमंत्री तसेच कित्येक वर्षे मंत्री राहिले. मात्र त्यांनाही या मैदानाचे सौंदर्यीकरण मार्गी लावणे शक्मय झालेले नाही.
सरदेसाईंना डच्चू मिळाल्यानंतर प्रस्ताव रखडला
मडगाव पालिकेत गोवा फॉरवर्डची सत्ता असताना पक्षाचे फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई हे मंत्री होते. पालिकेने पाठविलेल्या सौंदर्यीकरण प्रस्तावाचा पाठपुरावा त्यांनी केला होता. ‘जी-सुडा’मार्फत 2 कोटी रुपये खर्चून सदर सौंदर्यीकरण करण्यासाठी निविदाही काढण्यात आल्या होत्या. सरदेसाई यांना तोपर्यंत मंत्रिमंडळातून डच्चू मिळाला. मात्र भाजप सरकारकडून आर्थिक मंजुरी देण्यास टाळाटाळ होत असल्याने हे सौंदर्यीकरणाचे काम कागदोपत्रीच पडून आहे.
राज्यपालांनी घेतली होती दखल
माजी राज्यपाल सत्यपाल मलिक हे लोहिया यांच्या विचासरणीचे असल्याने त्यांनी ताबा घेतल्यानंतर सरदेसाई यांनी गोवा फॉरवर्डतर्फे एक पत्र लिहून आर्थिक मंजुरीविना पडून असलेले सौंदर्यीकरणाचे काम मार्गी लावण्यासाठी सरकारकडे पाठपुरावा करावा, अशी मागणी केली होती. मलिक यांनी मध्यंतरी लोहिया मैदानाला सदिच्छा भेट दिली असता उपस्थित पत्रकारांनी सौंदर्यीकरणाचे काम पडून असल्याचे त्यांच्या नजरेस आणून दिले होता. यासंदर्भात जे काही करणे शक्मय आहे ते करण्याचे व त्याविषयी सरकारशी चर्चा करण्याचे आश्वासन राज्यपालांनी दिले होते. त्यानंतर अजूनही लोहिया मैदानाचे नशिब फळफळलेले नाही. मात्र वरील साऱया प्रकारांमुळे या मैदानाच्या पवित्रतेला बाधा पोहोचत असल्याचे दिसून येत आहे.