दिगंबर कामत यांनी दिला इशारा
प्रतिनिधी / मडगाव
मडगाव शहरात दिवसेंदिवस भिकारी, बेघर, दारुडय़ांचा उपद्रव व वेश्या व्यवसाय फोफावत चालला आहे. सरकारने त्वरित या सर्व गैरव्यवहारांवर कारवाई न केल्यास आपण, यापुढे गप्प बसणार नाही. पुढील पंधरा दिवसांत ही समस्या सरकारने न सोडविल्यास मडगावकरांना सोबत घेऊन पुढील कृती करणे आपल्याला भाग पडेल असा इशारा विरोधी पक्षनेते तथा मडगावचे आमदार दिगंबर कामत यांनी दिला आहे.
जुन्या रेल्वे स्थानकाजवळ वेश्या व्यवसाय चालतो. तो बंद करावा अशी कित्येकदा मागणी स्थानिकांनी केली तरी पोलीस त्याकडे गांभीर्याने पहात नाही. हल्लीच एका तरूणीवर या ठिकाणी हल्ला करण्याचा प्रकार घडला होता. या तरूणीवर हल्ला केल्यानंतर ती मुख्य रस्त्यावर येऊन कोसळली. थोडय़ावेळाने सावरल्यानंतर पुन्हा ती जुन्या स्थानकाच्या गेटमधून आत गेली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. याची गंभीर दखल घेत आमदार दिगंबर कामत यांनी जुन्या रेल्वे स्थानकाजवळ भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्याच्या सोबत सासष्टीचे मामलेदार प्रतापराव गांवकर व स्थानिक नगरसेवक दामोदर नाईक व नगरसेवक मनोज मसूरकर उपस्थितीत होते.
भिकारी, बेघरांना ताब्यात घेऊन त्यांची रवानगी निवारा केंद्रात करावी, जुन्या रेल्वे स्थानकाकडे जाणाऱया वाटेची गेट बंद ठेवणे व तेथे सुरक्षा रक्षक तैनात करणे, मडगावातील सिने लता परिसरात बसणारे दारुडे व बेघर यांच्यावर कारवाई करणे, नगरपालिका इमारत व उद्यान भोवती बसणारे बेघर तसेच शहरात अनेक ठिकाणी लोकांना उपद्रव करणारे भिकारी यांच्यावर ताबडतोब कारवाई करावी अशी मागणी आपण दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱया सोबत काल मंगळवारी झालेल्या बैठकीत आपण केल्याची माहिती आमदार श्री. कामत यांनी दिली आहे.
अबकारी खात्याने शहरातील दारू विक्री दुकानांवर करडी नजर ठेवणे गरजेचे आहे. या सबंधी अबकारी खात्याला कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱयांनी दिले आहेत. कालच्या बैठकीला जिल्हाधिकारी अजीत रॉय, उपजिल्हाधीकारी विशाल कुंडईकर, मामलेदार प्रतापराव गांवकर, पोलीस उपअधिक्षक किरण पडवळ, पोलीस निरीक्षक सचिन नार्वेकर, कोंकण रेल्वेचे पोलीस निरीक्षक शरिफ जॅकीस, अबकारी खात्याचे निरीक्षक निलेश नाईक, कोंकण रेल्वेचे स्थानक प्रमुख प्रकाश गाड व स्थानिक नगरसेवक दामोदर नाईक व नगरसेवक मनोज मसूरकर इत्यादी उपस्थितीत होते.
दरम्यान, जुन्या रेल्वे स्थानकाकडे जाणाऱया वाटेची गेट मामलेदार प्रतापराव गांवकर यांनी कुलूप घालून बंद केली.