प्रतिनिधी/ मडगाव
गेली 19 वर्षे सातत्याने चालू असलेल्या मडगावच्या गोमंत विद्या निकेतन आयोजित प्रसिद्ध ‘विचार वेध व्याख्यानमाला’ 8 जानेवारीपासून मडगावात सुरु होत असून 12 जानेवारीपर्यंत ती सुरु राहील. अनेक नामवंत लेखक, नाटककार , साहित्यिक, अर्थतज्ञ या व्याख्यानमालेत भाग घेणार आहेत. यंदा विचार वेध व्याख्यानमालेचे हे 20 वे वर्ष आहे.
गोमंत विद्या निकेतनचे अध्यक्ष जनार्दन वेर्लेकर यांनी मडगावात घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी त्यांच्याबरोबर उपाध्यक्ष सुहास नायक उपस्थित होते.
विचार वेध व्याख्यानमाला गोमंत विद्या निकेतनच्या गोविंद (बाबा) कारे सभागृहात सायंकाळी होईल. 8 जानेवारी रोजी सायंकाळी 6 वाजता दत्ता गोविंद पै रायतुरकर स्मृती व्याख्यानमालेत अन्श थिएटर्सचे संस्थापक तथा नाटककार मकरंद देशपांडे यांचे ‘सतत नाटक’ या विषयावर व्याख्यान असेल.
9 जानेवारी रोजी सायंकाळी 5 वा. श्रीनिवास नायक स्मृती व्याख्यानमालेत ऋतुजा दिवेकर यांचे व्याख्यान होणार असून ‘स्थानिक जेवा आणि जागतिक विचार करा’ या विषयावर त्यांचे व्याख्यान होईल.
10 जाने. रोजी सायं. 6 वाजता दत्तात्रय एन. हेमाडी स्मृती व्याख्यानमालेत सातारा येथील डॉ. यशवंत पाटणे यांचे व्याख्यान होईल. ‘साहित्य आणि मानवी जीवनमुल्ये’ हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय असेल.
11 जाने. रोजी सायं. 6 वाजता दामोदर कृष्णा वेर्लेकर स्मृती व्याख्यान होणार असून डॉ. वसुधा कामत यांचे यावेळी व्याख्यान होईल. ‘एनईपी 2019: एक एटेम्पट् टू ट्रान्सफॉर्म दी इंडियन एज्युकेशनल सिस्टम’ या विषयावर त्यांचे व्याख्यान हाईल.
12 जाने. रोजी सायं. 6 वाजता बाबुसो कामत स्मृती व्याख्यानात भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर डॉ. उर्जित पटेल यांचे व्याख्यान होईल. ‘डॉ. उर्जित पटेल व डॉ. राहुल पै पाणंदीकर यांच्यातील चर्चा असे या व्याख्यानाचे स्वरुप असेल अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष जनार्दन वेर्लेकर यांनी दिली.