प्रतिनिधी/ मडगाव
मडगाव पालिकेच्या तांत्रिक विभागाने अखेर शहरी भागात रातोरात उभ्या राहिलेल्या गाडय़ाचे सर्वेक्षण केले असून तो बेकायदा उभारण्यात आल्याने त्यास कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार आहे. नवीन मुख्याधिकाऱयांनी अजून ताबा घेतला नसल्याने त्यांच्या सहीसाठी थांबावे लागले असून त्यामुळे नोटीस पाठविणे शक्मय झाले नसल्याची माहिती नगराध्यक्षा पूजा नाईक यांनी दिली.
कारणे दाखवा नोटिसीनंतर आवश्यक कारवाई करण्यात येणार असल्याचे नगराध्यक्षांनी स्पष्ट केले. पालिकेच्या तांत्रिक विभागाचे अभियंते सदर बेकायदा गाडय़ाचे सर्वेक्षण करण्यास चालढकल करत होते. प्रसारमाध्यमांतून व समाजमाध्यमांवर टीका होऊ लागल्याने तसेच नगराध्यक्षा नाईक यांनी अभियंत्यांना बोलावून आणून तंबी दिल्यानंतर सदर सर्वेक्षण करण्यात आले.
या सर्वेक्षणाची चाहूल लागल्याने सदर बेकायदा गाडा उभारलेल्यांनी रविवारी सुट्टीचा दिवस असल्याचा फायदा घेऊन सदर गाडय़ासमोर जुन्या पत्र्यांचा आडोसा निर्माण करून बेकायदा काम झाकून ठेवण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आलेले आहे. आता पालिका कोणती कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
मडगाव पालिकेपासून जवळच असलेल्या बोरकर सुपर मार्केटच्या समोरील जागेत हा गाडा रातोरात उभारण्याचा प्रकार घडला होता. एक गाडा उभा राहील एवढय़ा त्या जागेत आधी झाडेझुडुपे होती. गाडा उभा राहण्याच्या आठवडाभर पूर्वी कोणी तरी ती छाटून टाकली होती. त्यानंतर तीन-चार दिवसांनी येथे एक पक्का गाडा उभा राहिल्याचे दिसून आले होते. सदर गाडा तयार करून येथे आणून बसविण्यात आला असण्याची शक्मयता वर्तविण्यात येत आहे. पालिकेकडून सदर बेकायदा बांधकामावर कारवाई होत नसल्याने भरपूर टीका होऊ लागली होती.