प्रतिनिधी / मडगाव :
मडगाव पालिका क्षेत्रातील शहरी भागात हाताच्या बोटावर मोजण्याइतकी सुलभ शौचालये उपलब्ध असल्याने नागरिकांसाठी ती कमी पडत असल्याच्या तक्रारी आहेत. त्यातच पालिकेच्या जुन्या किरकोळ मासळी मार्केटच्या जागेत सुका कचरा टाकण्यात आल्याने तेथे स्थित सुलभ शौचालयाच्या ठिकाणी जायला वाटच शिल्लक न राहिल्याने लोकांची कुचंबणा होत असल्याच्या तक्रारी आहेत.
मडगाव पालिकेच्या नियोजित पार्किंग प्रकल्पाच्या सदर जागेत सध्या बेलिंग केलेला तसेच अजूनही बेलिंग न केलेला अशा स्वरूपाचा सुका कचरा मोठय़ा प्रमाणात पडून राहत असल्याचे दिसून येत आहे. सदर जागेत पालिकेकडून दोन बेलिंग यंत्रे वापरात आणून सुका कचऱयाचे बेलिंग करण्यात येत आहे. मात्र कोव्हिड-19 चा लॉकडाऊन सुरू झाल्यापासून बेलिंग करण्यात आलेल्या कचऱयाची उचल होत नसल्याने ही स्थिती उद्भवल्याचे सांगण्यात येत आहे. येथील व सोनसडय़ावरील सुक्या कचऱयाचे बेलिंग केल्यानंतर तो कर्नाटकातील सिमेंट कंपन्यांना पाठविण्यात येत होता. मात्र लॉकडाऊनमुळे अजूनही या सिमेंट कंपन्या कार्यरत झालेल्या नसल्याने सुका कचरा या कंपन्यांना पाठविणे शक्मय होत नसल्याची माहिती पालिकेच्या तांत्रिक विभागाच्या सूत्रांनी दिली.
पावसाळय़ात कचरा कुजण्याची भीती
कचऱयाने सर्व जागा व्यापली गेल्याने नियोजित पार्किंग प्रकल्पाच्या जागेत असलेल्या सुलभ शौचालयाच्या ठिकाणी जाण्यास जागाच शिल्लक राहिलेली नाही. याचा जवळपासच्या दुकानदारांना जास्त त्रास सहन करावा लागत असल्याचे दिसून येते. पालिकेने भर शहरात मिनी सोनसडाच बनविला असून कचऱयाचे बेलिंग केल्यानंतर उचल होत नसल्याने आम्हाला शौचालयात जाण्यासही वाट राहिलेली नाही. पालिकेने वाटेवरील कचरा हटवावा, अशी मागणी एका दुकानदाराने उचलून धरली. पावसाळय़ापूर्वी या कचऱयाची उचल न झाल्यास कचरा कुजून दुर्गंधीला सामोरे जावे लागण्याची भीती त्यांनी व्यक्त केली.
सोनसडय़ावरील बेलिंग केलेला कचरा वेर्णातील शेडमध्ये
दरम्यान, घनकचरा व्यवस्थापन महामंडळाने अलीकडेच वेर्णा औद्योगिक वसाहतीमध्ये एक शेड भाडेपट्टीवर घेतली असून सोनसडय़ावर बेलिंग करण्यात आलेला सुका कचरा या शेडमध्ये पाठविण्याच्या कामाला सध्या प्रारंभ झाला आहे. बेलिंग केलेला कचरा भिजलेला असल्यास सिमेंट कंपन्या स्वीकारत नसल्याने महामंडळाने सदर शेड भाडेपट्टीवर घेतली असल्याचे सांगण्यात आले. सोनसडय़ाप्रमाणेच वरील नियोजित पार्किंग प्रकल्पाच्या जागेत पडून असलेला सुक्मया कचऱयाचीही उचल करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. एक दिवस सोनसडय़ावरील, तर एक दिवस पार्किंग प्रकल्प जागेतील अशा प्रकारे कचरा आळीपाळीने उचलला गेल्यास ते सोयीस्कर ठरणार असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.