राज्यभरात अनेक तर्कविर्तक, पोलिसांकडून माहिती अनुपलब्ध, आणखी दोघा संशयितांचा शोध जारी
प्रतिनिधी/ मडगाव
मेसर्स कृष्णी ज्वेलर्स या आस्थापनाचे मालक स्वप्नील वाळके हे गोवा गोल्ड डिलर्स असोसिएशनचे सरचिटणीस होते. त्यांच्या खूनप्रकरणी मडगाव पोलिसांनी अटक केलेल्या तिन्ही आरोपींना पोलीस चौकशीसाठी 10 दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने शुक्रवारी दिलेला आहे. हे ‘सुपारी’ प्रकरण की काय किंवा दुसऱया एखाद्या कारणास्तव हा गुन्हा करण्यात आलेला आहे याची तपासयंत्रणा या 10 दिवसांच्या कालावधीत सखोल चौकशी करणार आहे.
पोलिसांनी पाहिलेल्या दुकानामधील सीसीटीव्ही फुटेजमध्ये त्यांना मिळालेल्या माहितीनुसार बुधवारी हल्लेखोर आस्थापनात भरदुपारी आला आणि थेट आस्थापनाच्या मालकावर गोळी झाडत असल्याचे त्यात दिसत आहे. याचाच अर्थ वाळके यांचा पत्ता कट करण्याचे कारस्थान कोठेतरी शिजलेले होते आणि बुधवारी त्याची अंमलबजावणी केलेली आहे, असे सकृत दर्शनी दिसून येत आहे.
सूचनांच्या अंमलबाजावणीकडे दुर्लक्ष
प्रत्येक ज्वेलरी आस्थापनाने सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत, आस्थापनाच्या बाहेर सुरक्षा रक्षक तैनात करण्यात यावा अशा सूचना पोलीस खात्याने यापूर्वीच दिलेल्या आहेत. मात्र, या सूचनांची अंमलबाजावणी केलेली आहे की नाही, याची खात्री करण्याची तसदी घेतलेली नाही. प्रशासनाने यासंबंधीची खात्री केली असती तर बुधवारी या आस्थापनासमोर सुरक्षारक्षक तैनात असता आणि कदाचित हा खुनाचा प्रकार टळला. सुरक्षारक्षकाने त्या हल्लेखोरांकडे सर्वप्रथम दोन हात केले असते आणि कदाचित स्वप्नील वाळके वाचले, असते अशीही चर्चा होत आहे.
मुस्तफा शेखच्या बचावासाठी तयारी?
या खून प्रकरणात पोलिसानी आतापर्यंत ओंकार पाटील, एडसन गोन्साल्वीस आणि मुख्य आरोपी मुस्तफा शेख या तिघांना अटक केलेली आहे. पैकी मुख्य संशयित आरोपी मुस्तफा शेख याच्या बचावाची तयारी आतापासूनच करण्यात येत असल्याचे वृत्त आहे. मानसिक स्थिती बरी नसल्याचा पुरावा न्यायालयासमोर आल्यास संशयित आरोपीला शिक्षा होणे कठीण असते. याचाच फायदा घेण्यासाठी या प्रकरणातील मुस्तफा शेख हा संशयित दिल्लीतील इस्पितळात उपचार घेत होता हे सिद्ध करण्याची तयारी आतापासूनच चालू असल्याचीही माहिती हाती आलेली आहे.
आणखी दोघा संशयितांचा तपास जारी
या प्रकरणात आणखी दोन संशयित गुंतलेले असल्याचा तपासयंत्रणेचा संशय असून त्यांना पकडण्यासाठी पोलीस प्रयत्न करीत आहेत. संशयितांचा आकडा 5 झाला तर हे दरोडय़ाचे प्रकरण बनते आणि गुन्ह्य़ाची तीव्रताही वाढणार आहे.
स्वप्नील वाळके यांच्या खुनाच्यावेळी अनेकजण घटनास्थळी होते. अनेकांनी जवळच असलेल्या इस्पितळाजवळ नेण्याचे काम केले होते. ज्या ज्या कोणाचा या कामी हात लागलेला आहे ते यावेळी पोलिसांना जबानी देतील का? किंबहुना त्यांनी या एकंदर प्रकरणासंबंधी मडगाव पोलिसांना जबानी द्यावी, अशी सर्वसामान्य लोकांची अपेक्षा आहे.
मुस्तफाबद्दल तपासयंत्रणेला ‘सॉफ्ट कॉर्नर’ असू शकतो
मुख्य आरोपी मुस्तफा शेख हा अनेक व्यवसायिकांकडून ‘रक्कम’ घ्यायचा अशी चर्चा आहे. त्या संबंधितांना संरक्षण देण्याच्या नावाखाली ही रक्कम असल्याचा बोलबाला आहे. ‘रकमे’चा हा आकडा कित्येक लाखांच्या घरात गेल्यानंतर ‘पार्सल’ व्यवस्थित ‘वर’ पर्यंत तो पोहोचवायचा अशीही चर्चा आहे. त्यामुळे या चर्चेतील माहितीत तथ्य असले तर साहजिकच या संशयितासंबंधी तपासयंत्रणेला ‘सॉफ्ट कॉर्नर’ असू शकतो. त्यामुळे आज ना उद्या हे प्रकरण न्यायालयात गेले की तेथे हा ‘सॉफ्ट कॉर्नर’ मुस्तफा शेखच्या सार्थकी लागेल, अशीही चर्चा आहे.