होली स्पिरीट ते पालिका चौक या पारंपरिक मार्गाने मिरवणूक होणार
प्रतिनिधी/ मडगाव
कार्निव्हल हा गोव्यातील आकर्षणाचा विषय आहे. फक्त कार्निव्हल बघण्यासाठी अनेक जण याकाळात गोव्यात दाखल होत असतात. यंदाच्या कार्निव्हलच्या ठिकाणानुसार तारखा जाहीर झाल्या आहेत. रविवार 19 रोजी मडगावमध्ये कार्निव्हल मिरवणूक होली स्पिरीट ते मडगाव पालिका चौक या पारंपरिक मार्गावर होणार आहे, अशी माहिती मडगाव कार्निव्हल समितीचे अध्यक्ष नगरसेवक कामिलो बार्रेटो यांनी दिली. यावेळी समितीचे पदसिद्ध अध्यक्ष असलेले नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर, उपनगराध्यक्ष दिपाली सावळ, नगरसेवक महेश आमोणकर, राजू नाईक व अन्य उपस्थित होते.
गेली काही वर्षे ही मिरवणूक रवींद्र भवन ते फातोर्डा या मार्गावर होत आली होती. पण त्याआधी होली स्पिरीट चर्च ते मडगाव पालिका चौक या मार्गाने ही मिरवणूक व्हायची. नंतर रहदारीच्या कारणाने हा मार्ग बदलण्यात आला. हा मार्ग बदलल्यानंतर अनेकांनी जुन्याच मार्गाची मागणी केली होती. आता पुन्हा एकदा जुन्या पारंपरिक मार्गानेच मडगावमध्ये मिरवणूक होणार आहे. कार्निव्हल मिरवणूकम परत मडगावमध्ये जुन्या मार्गावर आणल्याबद्दल नागरिकांकडून आनंद व्यक्त होत आहे. ही मिरवणूक 19 रोजी दुपारी 3 वा. सुरू होईल, अशी माहिती बार्रेटो यांनी दिली.
कार्निव्हल मिरवणुकीच्या व्यतिरिक्त 20 आणि 21 असे दोन दिवस अन्य कार्यक्रम पालिका चौकात होणार आहेत. यात वेशभूषा स्पर्धा आदींचा समावेश राहणार आहे. त्याचबरोबर पालिकेच्या सर्व 25 प्रभागांत खेळ तियात्र देखील सादर होणार असल्याची माहिती नगराध्यक्ष शिरोडकर यांनी दिली.217 margao 2