नगरसेवक घनश्याम शिरोडकर यांचा कार्यकर्त्यांसह प्रवेश
प्रतिनिधी /पणजी
मडगावचे माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक घनश्याम प्रभू शिरोडकर यांच्यासह मडगावातील अन्य आठ प्रमुख व्यावसायिकांनी शुक्रवारी तृणमूल काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यांच्या प्रवेशामुळे तृणमूलने आपला पाया आणखी मजबूत केला आहे. राज्यसभा खासदार तथा राष्ट्रीय उपाध्यक्ष लुइझिन फालेरो आणि खासदार डेरेक ओब्रायन यांच्या उपस्थितीत पणजी येथील पक्ष कार्यालयात हा प्रवेश कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
विद्यमान सरकार विकास तर करतच नाही, त्यांनी लोकहिताकडेही पूर्ण दुर्लक्ष केले आहे, अशी नाराजी शिरोडकर यांनी व्यक्त केली. विद्यमान आमदार दिगंबर कामत यांच्या 28 वर्षांच्या कार्यकाळात मडगावात नजरेत भरण्यासारखा कोणताच विकास झाला नाही. हे आमदार भाजपशी ‘मॅच फिक्सिंग’ करत असून मडगावसाठी त्यांनी कोणतेही काम केले नाही. त्यामुळे लोक सरकार बदलाची वाट पाहत आहेत, असे शिरोडकर म्हणाले.
ममता दीदी एक प्रेरणा आहे आणि ‘टीएमसी’ ही एकमेव शक्ती आहे, जी गोव्यातून भाजपचा सफाया करू शकते. म्हणुनच यावेळी केवळ भाजप आणि ‘टीएमसी’ यांच्यातच खरी लढत होणार आहे, असा दावा शिरोडकर यांनी केला.
शिरोडकर हे आमदार कामत यांचे दीर्घकाळचे सहकारी व निष्ठावंत कार्यकर्ते होते. परंतु सध्याची त्यांची कार्यपद्धत स्वतःपुरतीच मर्यादित असल्याचे दिसून आल्यामुळे शिरोडकर यांनी काँग्रेस सोडली. त्यांच्यासह प्रसाद नावेलकर, ताकी सय्यद, सुरेश कारापुराकर, मूसा शेख, अमर कंटक, मिन्हाजुद्दीन, अब्दुल कादर गाझी आणि अर्जुन हातरिकी यांनीही पक्षात प्रवेश केला.
शिरोडकर यांचे स्वागत करताना फालेरो यांनी, ‘टीएमसी’कडे समर्पित दृष्टी आणि ध्येय असल्याचे सांगितले. भाजपला पराभूत करून राज्यात ‘नवी पहाट’ आणण्यासाठी आम्ही सर्व शक्तीनिशी लढण्यास तयार आहोत, असे ते पुढे म्हणाले.
या प्रवेश सोहळ्यानंतर झालेल्या अन्य दोन समावेश कार्यक्रमांतून मडगावचे विद्यमान अपक्ष नगरसेवक महेश आमोणकर तसेच साळगाव येथील व्यावसायिक क्रीडापटू आशुतोष नाईक यांनीही टीएमसीमध्ये प्रवेश केला. पक्षाच्या नेत्या अविता बांदोडकर यांनी त्यांना पक्षात प्रवेश दिला.