प्रतिनिधी /मडगाव
गोव्यात सद्या 2022 मध्ये होणाऱया विधानसभेच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. अनेक मतदारसंघात राजकीय पक्षांच्या हालचाली वाढलेल्या आहेत. इच्छुक उमेदवार आपआपल्या परीने मोर्चे बांधणी करू लागले आहेत. अशा पार्श्वभूमीवर गोव्याची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱया मडगाव मतदारसंघात मात्र सामसूम आहे. या मतदारसंघाचे दिगंबर कामत हे गेली 32 वर्षे प्रतिनिधीत्व करीत आहेत. त्यांच्या विरोधात भाजपचा उमेदवार कोण असेल याकडे मतदारांचे लक्ष लागले आहे.
मडगाव मतदारसंघात 29,223 मतदार आहेत. त्यात 16,700 हिंदू मतदार, त्यानंतर मुस्लिम मतदार जवळपास 6000 हजार आणि सुमारे 7000 ख्रिश्चन मतदार आहेत. आज पर्यंत मडगावच्या मतदारांनी दिगंबर कामत यांच्या बाजूनेच कौल दिलेला आहे. दिगंबर कामत मग भाजपमध्ये असो किंवा काँग्रेसमध्ये मतदारांना फरक पडलेला नाही. दिगंबर कामत एक व्यक्ती म्हणूनच त्यांना मतदारांची अधिक पसंती असते असे आजपर्यंतच्या निकालावरून स्पष्ट झालेले आहेत.
मडगाव मतदारसंघाचा विकास झालेला नाही, खाण घोटाळा तसेच अन्य काही मुद्दे घेऊन भाजपकडून दिगंबर कामत यांना टार्गेट केले जात असले तरी दिगंबर कामत यांच्यावर कोणताच परिणाम होत नाही. ते अगदी शांतपणे आपले कामकाज पुढे नेत असतात. याच्या उलट मडगावात भाजप एकसंघ नाही. त्यांच्यात दुफळी आहे व या दुफळीचा परिणाम विधानसभा निवडणुकीत भाजपवर होत आलेला आहे.
दिगंबर कामत यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिल्यानंतर मडगावात तरी भाजपकडे भक्कम असे नेतृत्व नाही. मडगावात भाजपचे कार्य सुरू आहे. पण एकीचा अभाव आहे. जो पर्यंत भाजपमध्ये एकी निर्माण होत नाही, तो पर्यंत मडगावात दिगंबर कामत समोर आव्हान निर्माण करणे भाजपला शक्य होणार नाही. भाजपचे वरिष्ठ नेते याकडे किती गांभीर्याने पाहतात हा सुद्धा संशोधनाचा भाग बनलेला आहे.
2022 मध्ये होणाऱया विधानसभा निवडणुकीत भाजपच्या उमेदवारासाठी काही इच्छुक उमेदवारांची नावे चर्चेत आहेत. त्यात प्रामुख्याने मडगाव भाजप मंडळाचे अध्यक्ष रूपेश महात्मे, पांडुरंग उर्फ भाई नायक व राजेंद्र तालक. त्याच बरोबर मडगाव नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक घनश्याम प्रभू शिरोडकर हे देखील दिगंबर कामतच्या विरोधात निवडणूक लढविण्यास इच्छुक आहे. घनश्याम शिरोडकर हे भाजपच्या उमेदवारीसाठी इच्छुक असले तरी त्यांनी अद्याप भाजपमध्ये प्रवेश केलेला नाही. घनश्याम शिरोडकर यांना भाजपची उमेदवारी असेल तर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करावा व पक्षाचे कार्य पुढे न्यावे तरच त्यांचा उमेदवारीसाठी विचार होऊ शकतो असा सूर देखील स्थानिक भाजप कार्यकर्ते व्यक्त करतात.
भाई नायक व राजेंद्र तालक हे आपआपल्या परीने भाजपच्या उमेदवारीसाठी प्रयत्नशील आहेत. त्यात दोघेही भाजपचे कार्यकर्ते आहेत. भाजपमध्ये आणखीन दोन नावे चर्चेत होती ती शर्मद पै रायतूरकर व नवीन पै रायकर यांची. त्यात शर्मद पै रायतूरकर दोन वेळा पराभूत झाले तसेच मडगाव नगरपालिका निवडणुकीत ही त्यांना पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे त्यांचे नाव पिछाडीवर पडले. राहिले ते नवीन पै रायकर. भाजपसाठी मडगावात ते आपल्या परीने योगदान देत असले तरी पक्षाचे वरिष्ठ नेते त्यांना साथ देतील असे चित्र नाही.
मडगाव परिसरातील झोपडपट्टीतील मतांवर भाजपचा डोळा आहे. ही मते प्राप्त करण्यासाठी भाजप रणनिती आखत असला तरी भाजपला त्यात फार मोठे यश मिळणे कठीण आहे. हे मतदार दिगंबर कामत यांच्या बाजूनेच राहिले आहेत. त्यात खिंडार पाडणे तसे सहज शक्य होणे कठीण आहे. याच्या उलट मडगावात जी हिंदूची 16,700 मते आहेत. त्या मतावर भाजपने अधिक लक्ष केंद्रीत केल्यास भाजपला बऱयापैकी संधी आहे. त्यासाठी पक्षाला सक्षम नेतृत्वाची गरज आहे. सर्वांना सोबत घेऊन जाणार उमेदवार त्यासाठी पक्षाला निवडावा लागेल.
काँग्रेस व गोवा फॉरवर्ड यांची युती होणार की नाही हे अद्याप निश्चित झालेले नाही. जरी युती झाली नाही तरी दिगंबर कामतच्या मतांवर फार मोठा परिणाम होणार नाही. मडगावात खरी लढत काँग्रेस व भाजपमध्येच होणार आहे. भाजपचा उमेदवार कोण असेल याकडे सद्या सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.