‘जेएमजे वाईन्स’ वरही छाप्यात हजारोंचे मद्य
प्रतिनिधी /मडगाव
मडगाव पोलीस स्थानकाचा नव्यानेच ताबा घेतलेले पोलीस निरीक्षक सचिन नार्वेकर यांनी मंगळवारी मडगावातील दोन आस्थापनावर धाड घलून अवैधरित्या साठवणूक करुन ठेवलेला मद्याचा साठा जप्त केला. जप्त करण्यात आलेल्या या मद्याची किंमत अंदाजे रु. 54601/- इतकी आहे.
प्राप्त महितीनुसार मंगळवारी सकाळी मडगावच्या गजबजलेल्या ठिकाणी असलेल्या पाजीफोंड -मडगाव येथील बीग जी या आस्थापनावर मडगाव पोलिसांनी छापा मारला. या आस्थापनात अवैधरित्या मद्य असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती आणि याच माहितीच्या आधारे हा छापा टाकण्यात आला होता.
सुमारे 14,601 रुपये किंमतीच्या 159 मद्याच्या बाटल्या यावेळी पोलिसांनी जप्त केल्या आणि नंतर अबकारी खात्याच्या अधिकाऱयांकडे सुपूर्द केल्या.
‘जेएमजे वाईन्स’वर धाड
मडगाव पोलिसांनी मडगावच्या जुन्या स्टेशन रोडवर असलेल्या ‘जेएमजे वाईन्स’ या आस्थापनावर धाड घातली. या धाडीत सुमारे 40 हजार रुपये किंमतीच्या 864 मद्याच्या बाटल्या पोलिसांनी जप्त केल्या. जप्त केलेले हे मद्य नंतर अबकारी खात्याच्या अधिकाऱयांकडे सुपूर्द करण्यात आले.
पोलीस निरीक्षक सचिन नार्वेकर यांच्यासोबत पोलीस उपनिरीक्षक सागर धाटकर, हवालदार समीर नागनुरी, दिलखुष वेळीप, कल्पेश, विशाल प्रभू यांनी या कारवाईत भाग घेतला.