आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस व गोवा फॉरवर्डमध्ये युती होणार हे जवळपास नक्की आहे. त्यामुळे गोवा फॉरवर्डचे पारडे जड राहणार यात शंकाच नाही. त्यामुळे प्रयत्न करावे लागणार आहेत ते भाजपला. मडगाव व फातोर्डा जिंकण्यासाठी.
सासष्टी तालुक्यातील आठपैकी फातोर्डा व मडगाव मतदारसंघ सोडल्यास भाजपला विशेष असे स्थान नाहीच. आज भलेही तीन आमदार भाजपचे असले तरी ते भाजपचे म्हणण्याचे धाडस कोणीच करणार नाही. त्यांनी काँग्रेस पक्षातून भाजपमध्ये प्रवेश केल्यानेच ते भाजपचे आमदार बनले आहेत. त्यात सोमवारी झालेल्या नगरपालिकेच्या निकालातून मडगावात भाजपची पकड आणखीन ढिली झाल्याचे स्पष्ट संकेत मिळाले तर फातोडर्य़ात किंचित आशेचा किरण निर्माण झाला आहे. भाजपचे वरिष्ठ नेते आज सासष्टीकडे लक्ष देणार की नाही हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
मडगाव नगरपालिकेत काँग्रेस व गोवा फॉरवर्डच्या युतीने निर्विदाद यश मिळविले. युतीला 17 जागा मिळाल्या तर भाजपला केवळ सात जागांवर समाधान मानावे लागले. एक जागा अपक्षाला मिळाली. हा अपक्षसुद्धा विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांचा खंदा समर्थक. केवळ नगरपालिका निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्याने त्याने अपक्ष म्हणून अर्ज भरला व काँग्रेसच्या अधिकृत उमेदवाराचा पराभव केला. हा अपक्ष नगरसेवक कधीही पुन्हा दिगंबर कामत यांच्याकडे जाऊ शकतो आणि तसे झाल्यास श्री. कामत यांचे पारडे आणखीन मजबूत होणार हे निश्चित.
मडगावात भाजपला केवळ दोनच जागा मिळाल्या. या दोन्ही जागा स्थानिक उमेदवारांनी आपल्या स्वतःच्या हिंमतीवर जिंकलेल्या आहेत. उपमुख्यमंत्री मनोहर ऊर्फ बाबू आजगांवकर यांची पुतणी डॉ. रोनिता आजगांवकर तर माजी नगरसेवक केतन कुरतरकर यांची बहीण डॉ. सुशांता कुरतरकर या भाजप पुरस्कृत व्हायब्रंट मडगाव पॅनलमधून विजयी झाल्या. भाजपचे युवा नेते शर्मद पै रायतूरकर यांचा 12 मतांनी झालेला पराभव व रुपेश महात्मे यांचे वर्चस्व असलेला प्रभाग भाजपच्या हातातून जाणे ही भाजपसाठी धोक्याची सूचना मानली जाते.
मोती डोंगरावरील झोपडपट्टी व तेथील लोकवस्तीमुळे भाजपने नेहमीच मडगावचे आमदार तथा विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांना ‘टार्गेट’ केले आहे पण दिगंबर कामत यांचे केवळ मोती डोंगरावरच नव्हे तर संपूर्ण मडगाव मतदारसंघावर वर्चस्व असल्याचे नगरपालिकेच्या निकालातून स्पष्ट झाले आहे. मोती डोंगरावरून दिगंबर कामत यांच्यावर निशाणा साधला जातो पण याच मोती डोंगरावर भाजपचीदेखील हक्काची मते आहेत मात्र, बऱयाचवेळा त्याचा सोयीस्कर विसर पडतो. त्यात भाजपचे काही कार्यकर्ते व समर्थक सातत्याने सोशल मीडियाच्या माध्यमांतून श्री. कामत यांच्यावर टीकेची झोड उठवित असतात पण त्याचा कोणताच परिणाम मतांवर होत नाही हे सुद्धा या निकालाने स्पष्ट केले आहे.
दिगंबर कामत यांनी भाजपमधून काँग्रेसमध्ये प्रवेश केला व ते मुख्यमंत्री झाले. त्यांच्यानंतर भाजपकडे नेतृत्वाची कमतरता निर्माण झाली. ती भरून काढण्यास आजपर्यंत भाजपला यश आलेले नाही. आज जे नेतृत्व करतात, त्यांच्यात समन्वय नाही. त्यांच्यात प्रचंड मतभेद आहेत. त्याचबरोबर ज्यांनी मडगावात भाजपचा झेंडा लावला होता, तेच ज्येष्ठ कार्यकर्ते राजकारणाच्या मुख्य प्रवाहातून बाजूला पडलेले आहेत. या सर्व गोष्टींवर भाजपला पुन्हा एकदा सखोल विचार मंथन करणे भाग पडलेले आहे आणि पक्षाचे नेते या गोष्टीवर किती गांभीर्याने लक्ष देतात हे आगामी काळात कळणार आहे.
फातोडर्य़ात किंचित आशेचा किरण
फातोर्डा मतदारसंघात या पूर्वीच्या पालिका निवडणुकीत भाजपचा स्कोअर झिरोच होता. पण या निवडणुकीत भाजपने 11 पैकी 3 प्रभागात आपले तीन नगरसेवक निवडून आणून किंचित आशेचा किरण निर्माण केलेला आहे. एका प्रभागात तर भाजपचा उमेदवार केवळ सात मतांनी पराभूत झाला. गोवा फॉरवर्डला रोखणे तसे सहज शक्य होणारे नव्हतेच पण भाजपच्या कार्यकर्त्यांनी 4-5 प्रभागात गोवा फॉरवर्डला रोखले. तीन प्रभागात भाजपच्या उमेदवाराची निवड ही चुकीची होती ते खुपच कमकुवत होते हे निकालातून स्पष्ट झाले. अन्यथा फातोडर्य़ात भाजपची कामगिरी नक्कीच आणखी प्रभावी झाली असती.
गोवा फॉरवर्डचे सर्वेसर्वा विजय सरदेसाई हे भाजप सरकारात मंत्री, उपमुख्यमंत्री होते. त्यांच्याकडे वजनदार खाती देखील होती. त्याचा प्रभाव या मतदारसंघावर होताच. ते स्वतः तसेच त्यांच्या इतर खंदय़ा समर्थकांनी या निवडणुकीत झोकून दिले होते. कुठल्या प्रभागात कमी पडतो, याचा अभ्यास करून रणनीती आखली जायची. त्यामुळे नऊ प्रभाग जिंकणे त्यांना सहज शक्य झाले. भाजपने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, उपमुख्यमंत्री मनोहर आजगांवकर, मंत्री फिलीप नेरी रोड्रिग्ज व मंत्री नीलेश काब्राल यांना प्रचारासाठी आणले तरी त्यांना अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. स्थानिक पातळीवर आणखीन प्रयत्न होणे गरजेचे होते.
कुडतरीतील तीन पैकी दोन प्रभागात भाजपने बाजी मारली तर एका प्रभागात गोवा फॉरवर्डचे वर्चस्व राहिले. कुडतरीतील दोन प्रभाग यापूर्वीसुद्धा भाजपच्याच बाजूने होते. त्यात खिंडार पाडण्याचे प्रयत्न गोवा फॉरवर्डकडून झाले पण त्यांना यश आले नाही. फातोडर्य़ात भाजपला आगामी विधानसभा निवडणूक जिंकायची असल्यास आणखीन प्रभावी कामगिरी करावी लागणार आहे. कार्यकर्त्याची फळी आहेच, ती अधिक मजबूत करावी लागणार आहे. काही कार्यकर्त्यांमध्ये रूसवे-फुगवे आहेत तर ते दूर करावे लागणार आहे. त्यासाठी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी साथ द्यावी लागणार आहे. तरच फातोडर्य़ात पुन्हा भाजप चांगली कामगिरी करू शकेल.
आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस व गोवा फॉरवर्डमध्ये युती होणार हे जवळपास नक्की आहे. त्यामुळे गोवा फॉरवर्डचे पारडे जड राहणार यात शंकाच नाही. त्यामुळे प्रयत्न करावे लागणार आहेत ते भाजपला. मडगाव व फातोर्डा जिंकण्यासाठी.
महेश कोनेकर