प्रतिनिधी /मडगाव
मडगाव अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेने आपल्या लॉकर धारकांना अंतिम नोटीस जारी केली असून त्यांना 1 मार्च 2022 पासून 8 दिवसांच्या आत लॉकर्स समर्पण करण्यास सांगितले आहे. मडगाव अर्बन बँक सद्या अंडर लिक्विडेशन असून तत्पूर्वी सर्व लॉकर धारकांनी आपले लॉकर पुन्हा परत करावे असे कळविण्यात आले आहे.
अंडर लिक्विडेशन बँकेने लॉकर धारकांना चेतावणी देताना म्हटले आहे की, ज्यांनी त्यांचे लॉकर्स अद्याप समर्पण केले नाहीत, त्यांनी ते आठ दिवसांच्या आत समर्पण करावे, अन्यथा बँक स्वतःहून हे लॉकर खोलणार असून त्याचे परिणाम लॉकर धारकांवर होण्याची शक्यता आहे. लिक्विडेशनची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी लॉकर धारकांनी बँकेला सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.