सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा,अशाप्रकारातून संसर्गाला आमंत्रण मिळण्याची भीती
प्रतिनिधी/ मडगाव
मडगाव आरोग्य केंद्रावर लसीकरणासाठी शनिवार सकाळी गर्दी उसळून यावेळी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचे दिसून आले. अलीकडे कोविड संसर्ग वाढला आहे. मडगाव आरोग्य केंद्राच्या हद्दीत सर्वाधिक सुमारे 1800 च्या वर सक्रिय रुग्ण आहेत. त्यामुळे मडगाव व फातोर्डा हा पालिका परिसर कोविड हॉटस्पॉट बनला आहे. राज्यात कोविडमुळे रुग्ण दगावण्याच्या घटना वाढल्या आहेत. या पार्श्वभूमीवर कोविड लस टोचून घेण्याच्या बाबतीत आधी टाळाटाळ करणारे घाबरून आता लसीकरण करून घेण्यासाठी लसीकरण केंद्रावर गर्दी करत असल्याचे आढळून येत आहे.
हॉस्पिसियो इस्पितळासमोर असलेल्या मडगाव आरोग्य केंद्रावर शनिवारी सकाळी मोठी गर्दी दिसून आली. दोनशे-अडीचशे लोकांनी एकाचवेळी दाटीवाटीने गर्दी केल्याने येथे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचे स्पष्टपणे दिसत होते. या ठिकाणी तैनात करण्यात आलेल्या पोलीस व सुरक्षा रक्षकांना या गर्दीचे पडून गेल्याचे दिसून आले नाही. अशाने कोविड होऊ नये म्हणून लसीकरण करण्यासाठी गेलो असता कोविडचा संसर्ग होण्याची भीती एकाने बोलून दाखविली.
फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई यांनी आपल्या पक्षाचे कार्यालय असलेल्या ‘गोंयकार घर’ची जागा कोविड लसीकरणासाठी वापरात आणावी असे आवाहन सरकारला केले होते. मात्र सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे लसीकरण केंदे कमी असल्याने अशा ठिकाणी गर्दी पडत आहे. अशाने सरकार कोविड फौलावण्यास हातभार लावत आहे असे दिसून येते, अशी टीका गोवा फॉरवर्डचे कार्यकर्ता एलिसन मोरानीस यांनी केली आहे.